५० लाख ख्रिस्ती मतदारांचा मविआला पाठिंबा
पुणे – राज्यातील ५० लाख मतदार असलेल्या ख्रिस्ती समाजाचा वापर केवळ मतदानासाठी केला गेला. या समाजाचा एकही नेता विधीमंडळात पाठवला नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेला हा समाज कायम मागासलेला राहिला. या समाजातील योग्य व्यक्तींना विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीत संधी दिली जाईल, वेगवेगळ्या महामंडळांवर, तसेच अल्पसंख्यांक मंडळावर प्रतिनिधित्व करण्याचे दायित्व दिले जाईल. समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी पंडिता रमाबाई यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मितीही केली जाईल. या सूत्रांच्या पूर्ततेचे आश्वासन मिळाल्याने राज्यातील ख्रिस्ती समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ख्रिस्ती समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले नाही, तर पाठिंब्याचा फेरविचार केला जाईल, असे विजय बारसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित अशी ओरड केली जाते, त्यांनी अल्पसंख्यांक कशा प्रकारे स्वत:च्या हितासाठी, स्वत:ला राजकीय आणि प्रशासकीय स्थान मिळण्यासाठी एकगठ्ठा मतांचा उपयोग करतात, हे लक्षात घेतले आहे का ? हे केवळ भारतातच घडू शकते. याउलट बहुसंख्य हिंदू त्यांच्यावर अत्याचार होऊनही त्या कारणासाठी एकत्र येत नाहीत, हे दुर्दैवी आहे. – संपादक)