Mike Waltz : भारतसमर्थक माईक वॉल्ट्ज होणार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार !
अमेरिकेतील चीनविरोधी विधेयकांचे केले आहे समर्थन !
वॉशिंग्टन (अमेरिका) – नवनिर्वाचित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी फ्लॉरिडाचे खासदार माईक वॉल्ट्ज यांची अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, वॉल्ट्ज यांच्याकडे चीन आणि इराण विरोधी, तसेच भारतसमर्थक म्हणून पाहिले जाते. अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व अल्प करण्यासंबंधीच्या अनेक विधेयकांना वॉल्ट्ज यांनी समर्थन दिले होते.
सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय स्थापित करणे आणि राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांची कार्यवाही (अंमलबजावणी) करणे, हे या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे काम आहे. जॅक सुलिव्हन यांच्याकडे सध्या हे पद आहे.
कोण आहेत माईक वॉल्ट्ज ?
१. माईक वॉल्ट्ज हे अमेरिकी सैन्यातील विशेष संघटित दलामध्ये ‘ग्रीन बेरेट कमांडो’ म्हणून कार्यरत होते.
२. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी लढाही दिला आहे.
३. विद्यमान बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला होता.
भारताचे हित चिंतणारे वॉल्ट्ज !
वॉल्ट्ज ‘इंडिया कॉकस’ या अमेरिकी संसदेतील एक प्रमुख व्यासपिठाचे सहअध्यक्ष आहेत. इंडिया कॉकस हा अमेरिकी खासदारांचा असा एक गट आहे, जो भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सशक्त करण्यासाठी काम करतो. भारताच्या सूत्रांवर चर्चा करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. इंडिया कॉकसचे सध्या ४० सदस्य आहेत. यात डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. ते नियमितपणे भारतीय नेत्यांना भेटतात आणि भारताशी संबंधित सूत्रांवर अमेरिकी सरकारला सल्ला देतात.