लोकशाहीला शिवशाहीची साथ हवी !

‘लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेले राज्य, म्हणजे लोकशाही’, अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केली आहे. लोक याचा अर्थ देशात रहाणारी जनता. लोकशाहीची व्याख्या करतांना काही गोष्टी गृहीत धरण्यात आल्या आहेत. त्या अशा….‘देशातील जनता राष्ट्रहिताला प्राधान्य देईल. आपली संस्कृती, ऐतिहासिक आणि राजकीय परंपरेचा मान राखेल. परकीय आक्रमकांविषयी तिच्या मनात कोणतीही प्रेमभावना वा आदराची भावना असणार नाही, तसेच सत्य, न्याय, नीती याला प्राधान्य देऊन असत्य, अन्याय आणि अनैतिकता यांना नष्ट करण्यासाठी कठोरात कठोर निर्णय घेऊन त्याची कार्यवाही करण्याची क्षमता असलेल्या सुजाण नागरिकांनी एकत्र यावे. त्यांनी निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थीपणाने देशाचे संरक्षण करत देशातील सर्व जनतेला संघटित करून जनतेचा आणि राष्ट्राचा उत्कर्ष साधण्यासाठी उपयुक्त असलेली राज्यकारभार करणारी जी राज्यपद्धत आहे, तिला लोकशाही म्हणतात.’

छत्रपती शिवरायांच्या दरबारातील एक दृश्य

१. सध्याच्या राजकीय नेत्यांची दुःस्थिती !

आपल्या देशातील अनेक नेत्यांमध्ये राष्ट्राभिमान आढळून येत नाही. ही वस्तूस्थिती दृष्टी आड करता येत नाही, तसेच देशातील राष्ट्रपुरुष, संत, महात्मे, संस्कृती, धर्म यांविषयी स्वाभिमान बाळगणारे राजकीय नेते आपल्या देशात अभावानेच आढळतात. अनेक राजकीय नेत्यांना आपली हिंदु संस्कृती आणि धर्म यांसह आपल्या राजकीय परंपरेचा अभिमान नाही, श्रद्धा नाही अन् अभ्यासही नाही. त्यांच्या मनातील गुलामगिरीची वृत्ती आजही नष्ट झालेली नाही. लाचारी, सत्तापिपासू वृत्ती आणि देशातील नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याची हलाहलाशी स्पर्धा करणारी विषवल्ली ही त्यांच्या आचारात विचारात फोफावली आहे. पाकिस्तानसारख्या शत्रूविषयी त्यांच्या मनात ममत्व भावना आहे, तसेच घुसखोरांसाठी देशाच्या सीमांना भगदाड पाडणे आणि देशातील कायद्यांना धाब्यावर बसवणे, हीच वृत्ती त्यांना राष्ट्रभक्तीची वाटते.

श्री. दुर्गेश परुळकर

२. लोकशाहीतील त्रुटी आणि शिवशाहीत असलेले राष्ट्रहित

लोकशाहीची मुख्य त्रुटी ही की, लोकशाहीमध्ये निवडणुकीद्वारे निवडून यायचे आणि सत्ता प्रस्थापित किंवा सत्ता प्राप्त करायची; पण त्यासाठी ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या अपुर्‍या आहेत. त्यात जोपर्यंत आपण सुधारणा घडवून आणत नाही, तोपर्यंत आपल्या देशात ‘शिवशाही भली’, असेच वाटत रहाणार आहे.

शिवशाहीत फितुरीला, राष्ट्रद्रोहाला कोणताही वाव नाही. लोकशाहीत मात्र राष्ट्रघातकी विचार आणि आचार याला प्रतिबंध घालणारा कोणताही नियम वा निर्बंध नाही. राष्ट्रघातकी विचार व्यक्त करणार्‍यांना आणि आचार करणार्‍यांना कठोर शिक्षा मिळेलच, याची शाश्वती देता येत नाही. आज लोकशाहीने राष्ट्रद्रोह होऊ शकतो, ही शक्यताच स्वीकारल्याचे आढळून येत नाही. देशातील कोणत्याही नागरिकाची कोणतीही गोष्ट राष्ट्रहिताला कशाही प्रकारे बाधित करणारी असेल, तर तो राष्ट्रद्रोह म्हणून त्याला मृत्यूदंडाचीच शिक्षा असली पाहिजे; पण अशा प्रकारचे कोणतेही प्रावधान (तरतूद) केलेले आढळत नाही. म्हणून ‘शिवशाही भली’, असेच वाटू लागते.

शिवशाहीत कुणालाही कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नव्हती. त्या वेळी निर्माण केलेले सर्व निर्बंध राजासह सर्व नागरिकांना बंधनकारक होते. शिवशाहीतील प्रत्येक नागरिक काटेकोरपणे त्या निर्बंधांचे पालन करत होता. एखाद्याने निर्बंधांचे पालन केले नाही, तर त्याला तात्काळ कठोर शिक्षा होत होती.

३. लोकप्रतिनिधींवर अनेक गुन्हे नोंद

आज स्त्रियांवर होणारे बलात्कार लोकशाहीत आपल्याला थांबवता आलेले नाहीत. अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत ज्यांच्यावर विविध प्रकारचे खटले न्यायालयात चालू आहेत. अनेक नेत्यांची जामिनावर सुटका झाली असूनही ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, निवडणुकीला उभे रहातात, सत्तेत सहभागी होतात. अशी दुर्बलता राष्ट्राला घातक ठरते; म्हणूनच शिवशाही भली ठरते. शत्रूशी एकनिष्ठ राहून शत्रूचा जयजयकार करणे, हा आपल्या स्वतंत्र आणि सार्वभौम देशाच्या भूमीवर राष्ट्रद्रोह ठरत नसेल, तर अशी लोकशाही सबल आहे, असे म्हणता येत नाही; म्हणून बलिष्ठ असलेली शिवशाही लक्षावधी पटींनी श्रेयस्कर ठरते.

शिवशाही हे लोकशाहीचे बळ आणि वरदान !

आमच्या भारतमातेने पारतंत्र्याच्या तिमिरात काळ कंठला आहे. परकीय आक्रमकांनी तिला साखळदंडात बंदिस्त करून अनेक वेळा घायाळ केले आहे. एवढेच नाही, तर फुटीरतावाद्यांनी दिलेला कौल शिरसावंद्य मानून भारतमातेचे तुकडे करणारी परिस्थिती पुन्हा निर्माण होत असेल, तर त्या परिस्थितीतून भारतमातेची सुटका करण्यासाठी शिवशाहीचीच कास धरणे क्रमप्राप्त आहे.

लोकशाहीला शिवशाहीची साथ नसेल, तर लोकशाही अस्तित्वात रहाणार नाही. शिवशाही हे लोकशाहीचे बळ आहे. देशाची उज्वल परंपरा अबाधित राखण्यासाठी लोकशाहीला मिळालेले वरदान, म्हणजे शिवशाही आहे. परकीय आक्रमकांपासून लोकशाहीचे रक्षण करणारे कवच, म्हणजे शिवशाही आहे. कितीही बलाढ्य असलेला शत्रू शिवशाही समोर दुबळा ठरतो, याची साक्ष आपला दैदीप्यमान इतिहास देतो. याच शिवशाहीने देशातील पराजयाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली. या शिवशाहीला दुर्लक्षित करणे, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शपथेला धुडकावण्यासारखे आहे. म्हणून सारासार विचार केल्यानंतर आपण याच निर्णयाला येऊन पोचतो, ‘लोकशाही टिकवण्यासाठी शिवशाहीचा मार्ग अवलंबला पाहिजे, तरच देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहील. त्याचप्रमाणे देशाच्या सीमा कधीही आक्रसणार नाहीत’, याची ग्वाही शिवशाही देते. म्हणूनच शिवशाही भली आहे.

४. लोकशाहीतील स्वैराचारी व्यक्तीस्वातंत्र्य

लोकशाहीने देशातील नागरिकांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे; पण त्याचा मर्यादित उपयोग करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी देशातील नागरिकांकडे आहे, असे म्हणण्याची सोय राहिलेली नाही. जनतेला राज्यघटनेने स्वातंत्र्यासह कर्तव्येसुद्धा दिली आहेत; पण ती कर्तव्ये पार पाडली नाहीत, तर शिक्षा करण्याचे प्रावधान लोकशाहीत नाही. त्यामुळे शिस्तबद्ध नसलेली जनता केवळ स्वातंत्र्याचा उपभोग घेते आणि कर्तव्याकडे पाठ फिरवते. परिणामी देशघातक प्रवृत्तीला या स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर सहजतेने करता येते.

आज आपल्या देशात व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली देशाबाहेर जाऊन देशाला कलंकित करण्याचे साहस राजकीय नेत्यांमध्ये वाढले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी ! शिवशाहीत अशा प्रकारच्या स्वार्थी व्यक्तीस्वातंत्र्याला कुठेही वाव देण्यात आला नाही. त्यामुळे शिवशाही भली हे सिद्ध होते.

५. श्रीराम, श्रीकृष्ण आणि राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका करून होत असलेली विटंबना

आपल्या देशाची राष्ट्रीय, ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा थोर आहे. रामायण, महाभारत, हे आपले केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक ग्रंथ नसून ते ऐतिहासिक आहेत. तो आपल्या देशाचा दैदीप्यमान इतिहास आहे. असे असूनही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अस्तित्व अमान्य केले जाते. प्रभु श्रीरामाच्या जन्मस्थळी असलेले मंदिर उद्ध्वस्त करणारा बाबर मात्र नायक ठरतो आणि श्रीरामाच्या अस्तित्वावर संशय घेतला जातो.

श्रीकृष्णाच्या जन्मस्थळी असलेले मंदिरही असेच परकीय आक्रमकांनी अतिक्रमण करून स्वतःच्या ताब्यात घेतले. तीच अवस्था काशीविश्वेश्वराची आहे. देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षांचा काळ लोटला, तरी आपण ते मंदिर पुनश्च मिळवू शकलो नाही. अशा निस्तेज व्यवस्थेमुळे वीरप्रसावा भारतमातेची विटंबना होत आहे.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचा इतिहास विकृत करणारी व्यक्ती आपल्या लोकशाहीत देशद्रोही ठरत नाही. उलट अशी व्यक्ती अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आधारावर ‘छत्रपती शिवरायांचा इतिहास विकृत करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने आपल्याला दिले आहे’, असा विपरीत अर्थ लावून मोकळी होते. अशा घटनांनी देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय परंपरेला नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. देशाची ही दैदीप्यमान परंपरा नष्ट झाली की, देशाचे अस्तित्व धोक्यात येते. लोकशाही जर देशाच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करत असेल, तर सर्व परंपरा अबाधित ठेवणारी आणि राष्ट्राचे अस्तित्व जोपासणारी शिवशाही अधिक भली आहे.

६. राष्ट्रघातकी कृत्यांना आळा घालण्यासाठी क्षात्रतेजाने तळपणारी शिवशाही हवी !

काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीच्या आधारे राज्यघटनेत काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व बहाल केले आणि वेगळ्या राज्याचा दर्जा दिला. लोकशाही अशा प्रकारे देशाच्या सीमा आक्रसण्यासाठी उपयोगात आणली जात असेल. त्याचप्रमाणे काश्मीर देशाचा अविभाज्य भाग रहावा; म्हणून लोकशाहीच्याच बळावर तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला विरोध करून पुनश्च फुटीरतेला प्रोत्साहन देण्यास लोकशाही पोषक ठरणार असेल, तर अशा राष्ट्रघातकी कृत्यांना आळा घालण्यासाठी क्षात्रतेजाने तळपणारी शिवशाही उजवी ठरते.

आपल्याच देशातील राजकीय नेते देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्‍या राष्ट्रघातक प्रवृत्तीचा आधार घेऊन इस्लामी सत्ता या देशात प्रस्थापित करू पहात आहेत. अशा प्रसंगी लोकशाही उघड्या डोळ्यांनी होणारे सत्तांतर पहाण्यासाठी जनतेला भाग पाडणार असेल, तर अशा परिस्थितीत राष्ट्राचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवणारी आणि धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जतन करणारी शिवशाही अधिक मौल्यवान आहे.

७. शिवशाही अधिक बलवत्तर असून ती स्थापन करणे, हेच राष्ट्रीय कर्तव्य !

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी घेतलेली ती शपथ केवळ त्यांची एकट्याची नव्हती, तर त्यांच्या नंतर त्यांची परंपरा, वारसा जतन करणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाची ती शपथ आहे. छत्रपती शिवरायांची शपथ मोडली जाऊ नये; म्हणून त्यांचे वारसदार आहोत, असे सांगणार्‍या देशातील नागरिकांचे कर्तव्य हेच आहे की, लोकशाहीमुळे जर त्यांची शपथ मोडली जाणार असेल, तर तिच्या रक्षणार्थ शिवशाहीच या देशात प्रस्थापित करणे, हेच राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे.

या देशातील फुटीरतावादी जमात देशातील हिंदूंना सुखाने जगू देत नाही. देशातील मुसलमानबहुल भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण एकही पुतळा लोकशाही अस्तित्वात असूनही निर्माण करू शकलो नाही. हे सर्वांत दुःखदायक आहे. ‘छत्रपती शिवरायांचे अस्तित्व ज्यांना मान्य नाही, ते राष्ट्रपुरुष म्हणून ज्यांना मान्य नाहीत, अशी जनता या देशाचा नागरिक होण्यास अपात्र आहे’, असे लोकशाही मानत नसेल, तर ती तिची मर्यादा आहे. राष्ट्रहितासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडून राष्ट्रहित साध्य करणारी ‘शिवशाही अधिक बलवत्तर आहे’, असेच म्हणावे लागते.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (७.११.२०२४)