Pandharpur Kartiki Ekadashi MahaPuja : राज्यातील सर्व जनतेला सुख-समृद्धी लाभो ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर – वारकरी भाविकांना, तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी लाभो; त्यांच्या जीवनात ऐश्वर्य आणि भरभराट येवो, असे साकडे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सौ. सायली पुलकुंडवर, तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते १२ नोव्हेंबरला पार पडली. त्या प्रसंगी त्यांनी हे साकडे घातले. राज्यात आचारसंहितेमुळे शासनाच्या वतीने यंदा डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, ‘‘सर्व भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप, ‘स्कायवॉक’, दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत. याविषयी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करत आहेत.’’ या वेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मानाचे वारकरी
शासकीय महापूजेच्या वेळी दर्शन रांगेतून लातूर जिल्ह्याच्या उद्गीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर आणि सौ. सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. सगर दापत्य हे गवंडी काम करतात आणि गेल्या १४ वर्षांपासून ते नियमितपणे वारी करीत आहे. या दांपत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर विनामूल्य एस्.टी. पास देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले, तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले.`