पंतप्रधानांच्या पुणे दौर्यानिमित्त रस्ते वाहतुकीत पालट !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केले आहेत. मोदी यांची सभा टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात १२ नोव्हेंबर या दिवशी होणार असल्याने सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना.सी. फडके चौक ते नाथ पै चौक या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास प्रतिबंध असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यानिमित्त ११ नोव्हेंबरची मध्यरात्र ते १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात येणार्या जड वाहनांना बंदी आहे. सभेमुळे शहराच्या मध्यभागातील वाहतुकीतही पालट केला आहे.