मुंबईत दीपोत्सव कार्यक्रमात महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर !
लोअर परेल – येथील बोहरी चाळ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती होण्याच्या उद्देशाने ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल पाळेकर यांनी उपस्थित युवती आणि महिला यांना संबोधित केले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. उपस्थित महिलांनी असे प्रशिक्षण नियमित शिकण्याची सिद्धता दर्शवली. प्रशिक्षणासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळाचे अध्यक्ष श्री. ओंकार सावंत आणि मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी साहाय्य केले.
क्षणचित्र – व्याख्यानाला उपस्थित असलेल्या श्रीमती लता पवार (वय ७३ वर्षे) म्हणाल्या, ‘‘मुलींनी हे शिकायला हवे. मी स्वतः सगळ्यांना याविषयी सांगीन. हे पाहून मला ऊर्जा मिळाली.’’