हिंदु समाजाने १०० टक्के मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार
कोल्हापूर – वर्ष २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदी आणि भाजप यांची थोडीशी पिछेहाट झाली. हा पराभव नसून मतदार काहीसे सुस्तावलेले आणि बेसावध असल्याने झाली. भारतीय समाज हा हिंदुत्वामुळे मुळातच सहनशील आणि धर्मनिरपेक्ष म्हणजेच इतर कोणत्याही धर्मावर बळजोरी न करणारा आहे. भारताची ओळख अशीच टिकवणे आवश्यक आहे आणि यासाठी भारतात हिंदुत्व आवश्यक आहे. तरी हिंदु समाजाने १०० टक्के मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले. ‘प्रबोधन मंच’ आयोजित ‘राजकीय हिंदुत्व’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान मोदी यांचा उदय आणि त्यानंतर पालटत चाललेली भारतीय परिस्थिती यांवर अनेक उदाहरणे देऊन ती हिंदुत्वासाठी कशी पोषक आहेत ? याविषयी मार्गदर्शन केले. लोकशाहीमध्ये आपल्या अपेक्षा कोणत्याही असोत त्याचे उत्तर केवळ मतपेटीद्वारे देणे कसे आवश्यक आहे ? याचे त्यांनी अनेक दाखले या वेळी दिले.