काँग्रेसने २ वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री
कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यघटनेत पालट होऊ शकतात. नवीन कायदे अस्तित्वात येऊ शकतात; मात्र घटना पूर्णत: पालटू शकत नाही. असे असतांना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मात्र अनेक ठिकाणी जाऊन सत्ताधारी घटना पालटणार आहेत, असा अपप्रचार करत आहेत. वर्ष १९५२ आणि वर्ष १९५४ अशा दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपण ज्यांना घटनेचे शिल्पकार मानतो, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते महायुतीचे शिवसेनेचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले पुढे म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना, शेतकर्यांना कर्जमाफी, तसेच दलितांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारने लक्ष दिले आहे. जनधन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वल योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून भारत विकासाच्या दिशेने जात आहे. ‘हिंदुत्व’ हे जरी भाजपचे प्रमुख सूत्र असले, तरी आमच्यासारखे अनेक पक्ष ‘समानसूत्री कार्यक्रम’ आणि पंतप्रधानांचे ‘सबका साथ सबका विकास’ या सूत्रावर भाजप समवेत आहोत. भाजपची सगळी धोरणे आम्हाला पटतील आणि आमची सगळी धोरणे त्यांना पटतील, असे नाही. जे राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्यासमवेत आम्ही असून जे येथे राहून पाकिस्तान किंवा बांगलादेशाचे गुणगाण करतात त्यांच्या समवेत आम्ही नाही.’’
या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘महायुती एकसंध होऊन काम करत आहे. वर्ष २०१४ च्या विधानसभेत आम्ही ८ जागा जिंकल्या होत्या. तसे यश यंदाही महायुतीला मिळेल.’’
निवडणुकीनंतर दलित समाजातील लोकांना प्रत्येक गावात ५ एकर भूमी द्यावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. आज रोजगार नसल्याने युवक शहराकडे जात आहेत आणि त्यामुळे शहरात झोपडपट्टी वाढत आहे. अशा वेळी त्यांना गावातच भूमी मिळाल्यास शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध, तसेच अन्य उद्योगधंदे करता येतील. गावातील क्रयशक्ती गावातच राहील. त्यामुळे ज्याप्रकारे विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवून भूमी दान मिळवली, तशीच मोहीम राबवून आमच्या समाजालाही ५ एकर भूमी मिळावी. – रामदास आठवले |