‘करुणाकर’ योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण

प.पू. दादाजी वैशंपायन

१. योगतज्ञ प.पू. दादाजींच्या महिला भक्ताला तिच्या प्रसुतीविषयी काळजी वाटत असतांना तीर्थक्षेत्री गेलेले प.पू. दादाजी अचानक रुग्णालयात येऊन तिला भेटणे

श्री. अतुल पवार

‘वर्ष १९८० मध्ये योगतज्ञ प.पू. दादाजींची भक्त असलेल्या एका महिलेला प्रसुतीसाठी अचानक रुग्णालयात भरती करावे लागले. त्या वेळी दूरभाष किंवा भ्रमणभाष नसल्याने निरोप द्यायचे झाल्यास टपालाद्वारे पत्रव्यवहार करावा लागे. त्या भक्त महिलेला ‘स्वत:ची प्रसुती कशी होईल ?’, याविषयी काळजी वाटत होती. तिच्या कुटुंबियांना वाटले, ‘प्रसुतीविषयी प.पू. दादाजींना ठाऊक असते किंवा ते प्रसुतीस्थळी उपस्थित असते, तर योग्य झाले असते.’ योगतज्ञ प.पू. दादाजी साधनेसाठी तीर्थक्षेत्री गेले असतांनाच त्या भक्त महिलेला तातडीने रुग्णालयात भरती करावे लागले होते; मात्र श्री गुरु हे सर्वज्ञ असल्याने त्यांचे आपल्या भक्तांकडे बारकाईने लक्ष असते. त्याप्रमाणे प.पू. दादाजी जणू सूक्ष्मातून लक्ष ठेवून होते. भक्त महिलेला रुग्णालयात भरती केल्यानंतर योगतज्ञ प.पू. दादाजी तीर्थक्षेत्रावरून थेट रुग्णालयात आले. ‘ती भरती झालेल्या रुग्णालयाचे नाव किंवा पत्ता कुणाला सांगितला नसतांनाही योगतज्ञ प.पू. दादाजींना कसे कळले ?’, याचे तिच्या कुटुंबियांना आश्चर्य वाटले. अर्थात् योगतज्ञ प.पू. दादाजी सर्वज्ञ असल्याने त्यांनी सूक्ष्मदृष्टीने ते जाणले होते. ‘भक्तावर असलेल्या प्रीतीमुळे ते सर्वतोपरी काळजी घेऊन भक्तांचाही उद्धार करत’, हे मला शिकायला मिळाले.

२. ‘स्वाईन फ्लू’ या रोगातून जिवंत रहाण्याची निश्चिती नसलेल्या रुग्णाला योगतज्ञ प.पू. दादाजींनी मंत्रासह ‘दैवीकवच’ सिद्ध करून दिल्याने रुग्ण बरा होणे 

नाशिक येथे वर्ष २०१५ मध्ये ‘स्वाईन फ्लू’ची साथ आली होती. ‘स्वाईन फ्लू’ रोगामुळे बरेच रुग्ण दगावल्याचे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत होते. एका भक्ताचे नातेवाईक ‘स्वाईन फ्लू’मुळे रुग्णालयात भरती होते. त्यांची स्थिती अत्यंत बिकट होती. शेवटच्या स्थितीत असल्याने वैद्यांनी रुग्णाच्या नातेवाईकाला सांगितले, ‘‘रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा. आम्ही या रुग्णाच्या जीविताची निश्चिती देऊ शकत नाही.’’ त्यामुळे रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील वैद्यांनीही रुग्ण जगण्याची शाश्वती दिली नाही. त्यानंतर भक्ताला वाटले, ‘योगतज्ञ प.पू. दादाजी यांना सांगून काही उपाय विचारावा.’ भक्ताने रुग्णाची सर्व स्थिती प.पू. दादाजींना सांगितली. त्यानंतर प.पू. दादाजींनी रुग्णासाठी मंत्रासह एक ‘दैवीकवच’ सिद्ध करून दिले. ते कवच हातात घेऊन रुग्णाला मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्या रुग्णामध्ये पालट होऊ लागला आणि तो रोगातून बरा झाला. ‘तो रुग्ण जगेल’, असे वैद्यांनाही वाटले नसल्याने ‘स्वाईन फ्लू’ने मृत झालेल्या व्यक्तींच्या सूचीमध्ये त्या रुग्णाचे नावही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. केवळ प.पू. दादाजींनी दिलेल्या दैवी शक्तीच्या पाठबळावर हा रुग्ण रोगातून बचावला होता.

३१.०७.२०१५ या दिवशी नाशिक येथे कुसमाग्रज सभागृहामधे प.पू. दादाजी यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘स्वाईन फ्लू’मधून बचावलेल्या रुग्णाने स्वत: अनुभवकथन केले आणि नवीन आयुष्य मिळाल्याबद्दल प.पू. दादाजींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प.पू. दादाजी भक्ताच्या इच्छेस्तव रुग्ण नातेवाइकाच्या साहाय्याला धावून गेले. ‘योगतज्ञ दादाजी करुणाकर असल्याने ते गरजू, पीडित, तसेच दु:खी जनांच्या साहाय्याला धावून जात असत’, असे अनेक प्रसंगांवरून लक्षात येते.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१७.८.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक