जयपूर (राजस्थान) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वंशिका राठी (वय १८ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वंशिका राठी या पिढीतील एक आहे !
(वर्ष २०२४ मध्ये कु. वंशिका राठी हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के एवढी आहे. – संकलक)
कु. वंशिका राठी हिचा १२.११.२०२४ (कार्तिक शुक्ल एकादशी) या दिवशी १८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला आलेल्या अनुभूती, तसेच तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. वंशिका राठी हिला १८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
_____________________________
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. वंशिका राठी हिला आलेल्या अनुभूती
१. गणपतीचा नामजप केल्यावर ताप उतरणे
‘एकदा श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मला पुष्कळ ताप आला होता आणि अनिष्ट शक्तींचाही त्रास होत होता. त्या वेळी मी गणपतीला प्रार्थना करून त्याचा नामजप केला. तेव्हा ‘गणपतीने माझ्या डोक्यावर त्याचे चरण ठेवले असून त्यामुळे माझ्या भोवतीचे त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. मी ५ मिनिटे जप केल्यावर माझा ताप उतरला.
२. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकतांना भावजागृती होऊन पोटदुखीचा त्रास उणावणे
एकदा माझ्या पोटात पुष्कळ दुखत होते. त्या वेळी मी प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकले. भजनातील ‘आवोजी आवो साई के दरबार ।’ ही भजनाची ओळ ऐकतांना माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. तेव्हा ‘मी साईंच्या दरबारात आहे’, असे मला वाटले आणि पोट दुखण्याची जाणीव नष्ट झाली.
३. ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषावर मात करून गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याची सेवा करता येणे
‘गुरुपौर्णिमेच्या वेळी मी अर्पण मिळवण्यासंबंधी सेवा करू नये’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मला माझ्या ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषाची जाणीव झाली. त्यानंतर माझी गुरुसेवेची तळमळ वाढली. मी अर्पण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. ’
– कु. वंशिका राठी, जयपूर (१०.६.२०२४)
कु. वंशिका राठी हिची गुणवैशिष्ट्ये
१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रतीचा भाव : कु. वंशिका प्रत्येकात गुरुरूप पहाते आणि आध्यात्मिक त्रास होत असेल, तेव्हा ती गुरुदेवांना आत्मनिवेदन करून नामजपादी उपाय करते.
२. धर्माचरणाच्या कृती केल्यावर हलके वाटणे : कुंकू लावणे, प्रार्थना करणे आणि त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, या कृती केल्यावर तिला हलके वाटते.
– सौ. आशा राठी (आई), जयपूर, राजस्थान.(१२.५.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.