हिंदुत्व टिकवण्यासाठी मतदान करण्याची आवश्यकता ! – प्रा. प्रशांत साठे, अ.भा.वि.प.
पुणे – परकीय दास्यत्वातून बाहेर पडण्यासाठी स्वबोध, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वमंत्र आचरणात आणणे आवश्यक आहे. समाजात जातीय विद्वेष चालू असून तो थांबवण्यासाठी जातीय भेद मिटवून सकल हिंदूंनी एकत्र येत सामाजिक सलोखा कायम रहाण्यासाठी, राष्ट्रहितासाठी – हिंदुत्वासाठी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन अ.भा.वि.प.चे प्रा. प्रशांत साठे यांनी केले. सध्या हिंदुत्व टिकवण्यासाठी, देशहितासाठी मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. निगडी येथील कॅप्टन कदम सभागृहात ‘क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती’च्या वतीने आयोजित शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिक्षण संवाद कार्यक्रम’ उत्साहात पार पडला. व्यासपिठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, तसेच अ.भा.वि.प. राष्ट्रीय कार्यकारी परिषद विशेष निमंत्रित सदस्य प्रा. प्रशांत साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. साठे यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र पालट घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरसोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार आहे. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, या हेतूने केंद्र सरकारसह अनेक शैक्षणिक तज्ञ प्रयत्न करत आहेत.