फुरसुंगी (हडपसर) येथे हत्या करून महिलेचा मृतदेह पलंगातील कप्प्यात ठेवला !
पुणे – घरात एकट्याच असलेल्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाच्या कप्प्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात उघडकीस आली. महिलेची हत्या कुणी केली ? आणि त्यामागचे कारण काय आहे ? याचे पोलिसांकडून अन्वेषण करण्यात येत आहे. स्वप्नाली पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. (छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिला, मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही दु:स्थिती पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
स्वप्नाली यांचे पती उमेश मोटारचालक आहेत. ते काही दिवसांपूर्वीच प्रवासी घेऊन बीडला गेले होते. ते घरी परतले, तेव्हा घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात न दिसल्याने त्यांनी पत्नीचा शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांनी घरातील दागिने, रोकड, पत्नीचा भ्रमणभाष शोधण्याचा प्रयत्न केला. दागिने, रोकड पलंगात ठेवली का ? हे पहाण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. तेव्हा त्यांना त्यात पत्नीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याविषयीची माहिती दिली. त्यानंतर रात्रपाळीत गस्त घालणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक खंदारे, विनोद पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी अंगुली मुद्रा तज्ञ आणि श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले होते.