सौ. अनुश्री साळुंके घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. वेळेचे पालन करणे
‘सौ. अनुश्रीताई (सौ. अनुश्री साळुंके, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे) आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ताई आढावा वेळेत चालू करते आणि वेळेतच संपवण्याचा प्रयत्न करते. तिच्यामुळे आढावा चालू होण्यास विलंब झाल्यास ती लगेच आमची क्षमा मागते. आढाव्यात एखादा साधक एखादे सूत्र अधिक वेळ सांगत असेल, तर ताई त्याला ते सूत्र थोडक्यात सांगण्यास सुचवते.
२. व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची तळमळ
‘प्रत्येक आठवड्यात आमचा व्यष्टी साधनेचा आढावा झाला पाहिजे’, अशी तिला तळमळ असते. वैयक्तिक अडचणीमुळे तिला आढावा घेण्यास जमणार नसल्यास ती एक दिवस आधीच आढावा घेते किंवा आम्हाला आढावा लिहून देण्यास सांगते. ती बाहेरगावी गेल्यावर तिला आढावा घेण्यास जमणार नसेल, तर ती अन्य साधकाला आमचा आढावा घेण्यास सांगते, तसेच ‘आम्ही त्या साधकाला आढावा दिला कि नाही ?’, हे विचारते.
३. आढावा घेतांना ती आम्हाला ‘गुरूंना आपण कसे घडणे अपेक्षित आहे ?’, हे सांगते. त्यामुळे आम्हाला आढाव्यात आध्यात्मिक भावाची स्पंदने जाणवतात.’
– सुश्री (कु.) वेदिका खातू, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२४)