आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधली पाहिजेत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय तथा प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची (झारखंड) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

  • ७० संघटनांसह २०० हिंदुत्वनिष्ठांचा उत्साहपूर्ण सहभाग !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

रांची (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ‘धर्मांतर, भूमी जिहाद, ‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’, ‘प्रार्थनास्थळ कायदा १९९१’ यांसारख्या समस्यांवरील कायदेशीर उपायांवर विचारमंथन करण्यात आले. यामध्ये काशी आणि मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर, भोजशाळा, कुतूबमिनार यांच्या न्यायालयीन खटल्याची सद्यःस्थिती आणि भविष्यातील रूपरेषा, अल्पसंख्यांकांची व्याख्या कशी करावी ?’, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधली पाहिजेत. घुसखोरीच्या माध्यमातून लोकसंख्या पालटण्याचा चालू असलेल्या कारस्थानांविरुद्ध कायदेशीर रणनीती आखून लढायला हवे’, असे मार्गदर्शन केले.

रांची येथे समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने ‘ग्रीन होरायझन’ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी झटणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, विश्व हिंदु परिषदेचे झारखंड प्रांताध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व अन् ईशान्य भारताचे राज्य समन्वयकश्री. शंभू गवारे उपस्थित होते. या अधिवेशनात ‘सनातन पंचांग २०२५’ (हिंदी) याचे लोकार्पण पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंद पुरी, पू. डॉ. शिवनारायण सेन आणि सनातन संस्थेचे पू. प्रदीप खेमका यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सनातन पंचांग २०२५’ (हिंदी)चे लोकार्पण करतांना डावीकडून पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, स्वामी निर्गुणानंद पुरी, पू. डॉ. शिवनारायण सेन आणि पू. प्रदीप खेमका

बांगलादेशातील हिंदूंच्या साहाय्यासाठी भारतियांनी पुढे यावे ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, संस्थापक, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

बांगलादेशात हिंदु सुरक्षित नाहीत. सामूहिक बलात्कार, हत्या, बलपूर्वक धर्मांतर, हिंदूच्या मालमत्तेची लूट अशा विविध प्रकारचे अत्याचार तेथील हिंदूंवर होत आहेत. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्र, मानवाधिकार संघटना, बांगलादेश सरकार किंवा सैन्य यांच्याकडून कोणतेही साहाय्य मिळत नाही. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतीय जनतेने पुढे आले पाहिजे, अन्यथा १ कोटी ५० लाख हिंदूंचा वंशविच्छेद होईल.

सनातन हिंदु समाजाला बळकट करण्यासाठी जे काही कार्य केले जाईल, त्या कार्याला सदैव पाठिंबा राहील. – श्री. चंद्रकांत रायपत, झारखंड प्रांताध्यक्ष, विश्व हिंदु परिषद.

हिंदु राष्ट्र उभारणीच्या कार्यात गोप-गोपींसारखे सहभागी व्हा ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, शास्त्र धर्म प्रचार सभा

पू. डॉ. शिवनारायण सेन

जो स्वतःमध्ये असलेल्या रजोगुण आणि तमोगुण यांचा नाश करतो, तो हिंदु होय. हिंदु राष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात आपल्या सर्वांना गोप-गोपींसारख्या काठ्या लावायच्या आहेत आणि त्या कार्यात सहभागी व्हायचे आहे.

केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

चेतन राजहंस

सध्या बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी वेळीच पावले उचलली पाहिजेत, अशी आमची केंद्र सरकारला आग्रहाची विनंती आहे, तसेच मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे. त्यामुळे सरकार अधिग्रहित ‘मंदिरमुक्ती चळवळी’ला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला झारखंड, बंगाल, छत्तीसगड, ओडिशा आणि बांगलादेश येथील ७० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि हिंदुहिताच्या उपक्रमांना चालना मिळावी’, यांसाठी ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले. यामध्ये झारखंड, बंगाल, छत्तीसगड, ओडिशा आणि बांगलादेश येथील ७० हून अधिक संघटनांचे २०० हून अधिक प्रतिनिधी, पदाधिकारी, अधिवक्ते, संत, मंदिराचे विश्वस्त, उद्योगपती, पत्रकार अन् संपादक उपस्थित होते. सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन हिंदु समाजाच्या सुरक्षेसाठी कार्य करण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन केली आहे.