देवावर अल्प प्रेम असतांना त्याच्याकडून अपेक्षा कशी करता येईल ?
गोदीमधील (जहाज बांधण्याचे ठिकाण म्हणजे गोदी) एक मोठे अधिकारी प्रतिदिन नियमाने गुरुचरित्राचे वाचन करत. गुरुवारी त्यांचा उपवास असे. सायंकाळी घरी गेल्यावर पुनः २ घंटे गुरुचरित्र वाचून नैवेद्य आणि आरती करून ते उपवास सोडत. असा त्यांचा क्रम १५ वर्षे चालला होता. एकदा ते श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना) यांना भेटले आणि म्हणाले, ‘माझ्या मते देव फार कठोर आहे.’ श्रीमहाराजांनी विचारले, ‘आपण असे का म्हणता ?’ त्यांनी सांगितले, ‘इतकी वर्षें मी मनोभावाने सेवा करत आहे, तरी आतापर्यंत मला काहीच अनुभव आलेला नाही.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘तुम्हाला देवाच्या जागी नेमले असते आणि देव तुमच्या जागी तुमच्यासारखा वागला असता, तर तुम्ही त्याच्याशी अधिक कठोर वागला असता.’ ते गृहस्थ बोलले, ‘आपण काय म्हणता, हे मला समजत नाही.’ श्रीमहाराजांनी विचारले, ‘गुरुवारी कार्यालय संपल्यावर तुम्ही काय करता ?’ ते म्हणाले, ‘हलवायाकडे जाऊन मी प्रसादासाठी पाव किलो पेढे घेतो. फुलवाल्याकडून मी देवासाठी हार घेतो आणि नंतर घरी येतो.’ श्रीमहाराज म्हणाले, ‘हारासह तुम्ही आणखी एक वस्तू घेता, ती सांगायची राहिली.’ तेव्हा त्यांना आठवले की, हार घेतो त्याच वेळी पत्नीसाठी एक चांगली वेणी नियमाने घेतो आणि तसे त्यांनी श्रीमहाराजांना सांगितले. ते ऐकून श्रीमहाराज म्हणाले, ‘फुलवाला हाराची पुडी जशी बांधून देतो. तशीच ती आपण पिशवीत टाकतो. त्या हारामध्ये काही कोमेजलेली फुले नाहीत ना, हे काही आपण बारकाईने पहात नाही. याच्या उलट वेणी घेतांना ती पत्नीस आवडेल, अशीच घेण्याची काळजी घेतो. यावरून देव आणि पत्नी यांपैकी आपले प्रेम कुणावर अधिक आहे, हे दिसून येते. मग देवावर जेथे अल्प प्रेम आहे. तेथे त्याच्याकडून यापेक्षा अधिक अपेक्षा कशी करता येईल ?’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक – ल.ग. मराठे)