Meat & Alcohol In UK PM Diwali Party : दिवाळीच्या कार्यक्रमात मांसाहार आणि मद्य यांचा वापर !
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ या शासकीय निवासस्थानी दिवाळी साजरी केली होती. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांसाहार आणि मद्य देण्यात आले. यामुळे हिंदूंनी त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ‘इनसाइट यूके’ या ब्रिटनमधील हिंदु संघटनेने यावर टीका केली आहे. ‘असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी योग्य मत घ्यायला हवे होते’, असे या संघटनेने म्हटले आहे.
१. या संघटनेने म्हटले की, पंतप्रधान स्टार्मर यांनी त्यांच्या दिवाळीच्या कार्यक्रमात ज्या पदार्थांची निवड केली, त्यामुळे त्यांचा धार्मिक परंपरांविषयीचा समज आणि आदर यांचा अभाव दिसून येतो. समारंभ आयोजित करण्यापूर्वी त्यांनी धार्मिक नेत्यांशी संपर्क साधला होता का ? स्टार्मर यांना अध्यात्माची जाण नाही.
२. या संघटनेने सामाजिक माध्यमांत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिवाळी केवळ उत्सवाचा काळ नाही, तर त्याचे धार्मिक अर्थही आहेत. दिवाळीचा पवित्र सण शुद्धता आणि भक्ती यांवर भर देतो आणि म्हणूनच पारंपरिकपणे शाकाहारी अन्न ग्रहण केले जाते. मद्याला सक्त मनाई आहे.
३. अनेक हिंदु संघटनांनीही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळण्यावर आक्षेप नोंदवला. २९ ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमाला ब्रिटीश भारतीय समुदायातील नेते, व्यावसायिक आणि संसद सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकादिवाळीच्या सणाचे पावित्र्य जाणून तो साजरा करण्याचा विचार स्वतःला सुसंस्कृत आणि सभ्य समजणार्या ब्रिटिशांमध्ये नाही, असेच यावरून म्हणावे लागेल ! |