‘व्होट जिहाद’ विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध पुकारण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन !
छत्रपती संभाजीनगर – व्होट जिहादमुळे लोकसभेत १० मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ते ‘व्होट जिहाद’ करत असतील, तर मतांचे धर्मयुद्ध करण्यासाठी संभाजीनगरने सिद्ध राहिले पाहिजे. छत्रपती शिवरायांचा देव, देश आणि धर्म मंत्र काय असतो ? हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिपादन केले. येथे आयोजित एका प्रचारसभेत ते बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभेत यांनी व्होट जिहाद ही नवीन पद्धत चालू केली आहे. धुळे लोकसभेतील ५ मतदारसंघात आपण १ लाख ९० सहस्र मतांनी पुढे होतो; मात्र एकट्या मालेगाव मध्य मतदारसंघात विरोधकांनी १ लाख ९४ सहस्र मते घेऊन आपला पराभव केला. बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नाव दिले; मात्र आता काही नेत्यांना शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची लाज वाटते. आता ते त्यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणतात, ही शोकांतिका पहावी लागते. ‘ओवैसी सुन लो, हे छत्रपती संभाजीनगर आहे. कुणाचा बापही हे नाव बदलू शकत नाही’, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.