दोडामार्ग तालुक्याचा आरोग्य सेवेचा प्रश्न खरच सुटला आहे का ?
‘दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप’चे वैभव इनामदार यांचा राजकीय नेत्यांना प्रश्न
दोडामार्ग – तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न आम्ही सोडवला. दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी आम्ही संमत केला, असे जे नेते सांगत आहेत, त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना आजही बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात का पाठवले जाते ? दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची आजची परिस्थिती काय आहे ? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सेवेच्या अभावी हाल का होत आहेत ?, या प्रश्नांसह अन्य प्रश्नांची उत्तरे या नेत्यांनी द्यावीत, अशी मागणी ‘दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप’चे वैभव इनामदार यांनी सामाजिक माध्यमातून केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य सेवा डबघाईला आलेली आहे. असे असतांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही नेते दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य सेवेविषयी वक्तव्य करत आहेत. याचा संदर्भ देत इनामदार यांनी म्हटले आहे की, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून किती वर्षे झाली ? त्या वेळी निधी का संमत केला नाही ? बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात तपासणीसाठी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे जिल्हा, तसेच दोडामार्ग तालुक्यातील गोरगरीब जनतेचे हाल होत असतांना हे नेते कुठे आहेत ? तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी सर्वसामान्य जनतेने ‘जन आक्रोश’ आंदोलन केले होते. त्या वेळी नेते मंडळींनी आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. तुम्ही सर्व केले आहे, तर आज तालुक्यातील आरोग्य सेवेची वस्तूस्थिती काय आहे ? आज ही सत्य परिस्थिती निवडणुकीचा काळात समाजासमोर मांडणे आवश्यक आहे, असे इनामदार यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेसाठी जनतेला आवाज उठवावा लागतो, हे दुर्दैव ! |