परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगात संतसेवेचे महत्त्व सांगितल्यावर त्याविषयी साधिकेचे झालेले चिंतन !
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगामध्ये सांगितलेले संतसेवेचे महत्त्व !
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एका सत्संगात सांगितले, ‘‘संतांच्या समवेत अनेक जण असतात; परंतु प्रत्येकालाच संतसेवेची संधी मिळत नाही. त्यातील एखाद्यालाच संतसेवेची संधी मिळते. संतसेवा करणे कठीण असते. ज्याला संतसेवा मिळते, तो ‘शिष्य’ या टप्प्याला गेलेला असतो. त्यामुळे त्याला संतसेवा मिळालेली असते. संत या सेवेच्या माध्यमातून शिष्याला शिकवत असतात. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये गुरु-शिष्याचे नाते निर्माण होते.’’
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगानंतर ‘साधकांना संतसेवेचा कसा आणि का लाभ होतो ?’, याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे
२ अ. ‘साधकाचा विचार आणि त्याची कृती ईश्वराला अपेक्षित अशी व्हावी’, याची संतांना तळमळ असणे : संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यांच्या मनात अपेक्षांचा लवलेश नसतो आणि प्रत्येकाविषयी केवळ प्रीतीच असते. ‘साधकाचा प्रत्येक विचार आणि त्याची कृती ईश्वराला अपेक्षित अशी व्हावी’ अशी संतांना पुष्कळ तळमळ असते.
२ आ. संतसेवा केल्यामुळे साधकांना होणारे लाभ
२ आ १. संतांनी चूक सांगितल्यावर मन अंतर्मुख होऊन साधकांना चुकीविषयी खंत वाटू लागणे : साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, या दृष्टीने संत नेहमी सतर्क असतात. साधकांकडून काही चूक झाल्यास किंवा त्यांच्या मनात अयोग्य विचार असल्यास संत तत्त्वनिष्ठ राहून त्याविषयी सांगतात. संतांनी सेवेतील एखादी चूक सांगितली, तरी दुसर्या क्षणाला साधक त्यांची प्रीतीही अनुभवतो. त्यामुळे साधकाला स्वतःकडून झालेल्या चुकीविषयी खंत वाटून त्याच्या मनातील संघर्ष क्षणार्धात थांबतो. त्याचे मन अल्पावधीत अंतर्मुख होते. चुका समजल्यामुळे साधकांचे मन सतर्क होऊन त्यांच्या प्रयत्नांची गती वाढते आणि हळूहळू ‘जाणूनी श्रींचे मनोगत’ या उक्तीप्रमाणे साधकांकडून भावपूर्ण प्रयत्न होऊ लागतात.
२ आ २. संतसहवासात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न चालू होणे : संतांमधील चैतन्यामुळे साधकांच्या मनावर आलेले स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण दूर होते अन् त्यांचा उत्साह वाढू लागतो. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या दृष्टीने साधकांच्या प्रयत्नांना गती येते.
२ आ ३. साधकांचे साधनेचे प्रयत्न आणि तळमळ यांत वृद्धी होणे : ‘संतांचे ईश्वराशी असलेले अनुसंधान, ईश्वराप्रतीचा भाव आणि तळमळ’ हे गुण पाहून साधकांना ‘आपल्यामध्येही हे गुण यावेत’, असे वाटू लागते आणि नकळत त्यांचे प्रयत्नही चालू होतात. संतसहवासात साधकाचे मन हळूहळू सकारात्मक होऊ लागते.
२ आ ४. संतांचा ईश्वराप्रतीचा भाव पाहून साधकांची भावजागृती होते आणि हळूहळू त्यांच्यात भाववृद्धी होऊ लागते.
‘प.पू. गुरुदेवांनी त्यांना अपेक्षित अशी संतसेवा माझ्याकडून करून घ्यावी. या सेवेचा मला माझ्या साधनेसाठी लाभ करून घेता यावा’, अशी त्यांच्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, फोंडा, गोवा.