राधेचे श्रीकृष्ण प्रेम !
एक दिवस रुक्मिणीने भोजन झाल्यावर श्रीकृष्णाला दूध पिण्यास दिले. दूध अधिक गरम होते. श्रीकृष्णाच्या हृदयात आग झाली आणि तिथे चट्टे पडले. श्रीकृष्णाच्या तोंडून नकळत ‘हे राधे..’ असे शब्द बाहेर पडले. ते शब्द ऐकून रुक्मिणी म्हणाली, ‘‘प्रभु, राधेमध्ये असे काय आहे ? ज्यामुळे आपण श्वासागणिक तिचे नाम जपता. मीही आपल्यावर अपार प्रेम करते; परंतु आपण माझे नाव कधी घेत नाही.’’ श्रीकृष्ण म्हणाले, ‘‘हे देवी, तू कधी राधेला भेटली आहेस का ?’’ असे म्हणून श्रीकृष्णाने मंद स्मित केले.
दुसर्याच दिवशी रुक्मिणी राधेला भेटण्यासाठी तिच्या महालात पोचली. राधेच्या महालाबाहेर एका अतिशय सुंदर स्त्रीला रुक्मिणीने पाहिले. तिच्या चेहर्यावर पुष्कळ तेज होते. हीच राधा असावी, असा विचार करून रुक्मिणी तिचे चरणस्पर्श करण्यासाठी वाकली. त्या स्त्रीने रुक्मिणीला अडवले आणि विचारले, ‘‘आपण कोण आहात ?’’ रुक्मिणीने तिची ओळख सांगितली आणि राधेला भेटायला आल्याचेही सांगितले. ती स्त्री म्हणाली, ‘‘मी राधाजींची दासी आहे. ७ दरवाजे पार केल्यानंतर राधाजी आपल्याला भेटतील.’’ रुक्मिणीने ७ दरवाजे पार केले. प्रत्येक दरवाजावर एकापेक्षा एक सुंदर आणि तेजस्वी दासीला पाहिल्यावर रुक्मिणीच्या मनात विचार आला, ‘राधेच्या दासी इतक्या सुंदर, रूपवान आणि तेजस्वी आहेत, तर राधा कशी आणि किती सुंदर असेल ?’, असा विचार करत करत रुक्मिणी राधेच्या कक्षात पोचली. तेथे अतिशय अनुपम सौंदर्ययुक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या राधेला पाहून रुक्मिणीने नमस्कार करण्यासाठी स्वतःला तिच्या चरणांवर झोकून दिले. नमस्कार करतांना रुक्मिणीला राधेच्या चरणांवर गरम पदार्थाने उमटलेले चट्टे दिसले. रुक्मिणीने विचारले, ‘‘देवी, आपल्या चरणांवर हे कसले चट्टे पडले आहेत ?’’ राधा म्हणाली, ‘‘देवी, काल तुम्ही श्रीकृष्णाला जे दूध दिले, ते पुष्कळ गरम होते. त्यामुळे त्यांच्या हृदयावर चट्टे पडले. श्रीकृष्णाच्या हृदयात सदैव माझा वास असल्यामुळे माझ्या पायांवरही चट्टे पडले.’’ हे ऐकून रुक्मिणीला अश्रू अनावर झाले. तिने राधेच्या श्रीकृष्ण प्रेमाची प्रचीती अनुभवली. आपणही श्रीकृष्णावर अशा प्रकारे प्रेम करण्याचा प्रयत्न करूया.
श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची आपल्या आजूबाजूला सतत जाणीव ठेवली, तर त्याला अनुभवता येते. श्रीकृष्णाशी सतत बोलत राहिले, तर तो प्रतिसादही देतो, आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो. श्रीकृष्णाला प्रार्थना करणे, त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करणे, श्रीकृष्णाला शरण जाणे, त्याची क्षमायाचना करणे या कृतीतून त्याला अनुभवता येते. श्रीकृष्णाविषयी भाव जागृत करणार्या या गोष्टी केल्या, आपलेही श्रीकृष्णाप्रतीचे प्रेम वाढेल आणि आपणही श्रीकृष्णाचे प्रेम अनुभवू शकू.
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.