बालपण हरवले का ?
‘बालपण’ – आयुष्यातील सोनेरी पानांचा संच. बालपणीच्या गोड आठवणी खचून जाणार्या अनेक प्रसंगांमध्ये मनाला बळ आणि ऊर्जा देतात. बालपणीचे संस्कार एक चांगला नागरिक नकळत घडवतो. बालपणी खाल्लेला मार आयुष्यातील अनेक चुकांपासून माणसाला परावृत्त करतो; पण आज मुलांना हे ‘बालपण’च पारखे झाले आहे. बालपणीची जागा आज ‘टॅबलेट’ने (मध्यम आकाराच्या संगणकाने) घेतली आहे. विदेशातील हे खूळ भारतात येण्यापूर्वीच आपण सावध होऊया. याविषयीचा एक ‘व्हिडिओ’ प्रसारित होत आहे. १-२ वर्षांच्या मुलांच्या हातात ‘टॅबलेट’ देणे, म्हणजे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीपूर्वीच त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचे प्रावधान (तरतूद) करून ठेवण्यासारखे आहे. मुलांच्या हातातून ‘टॅबलेट’ काढून घेतल्यावर ती आक्रमक होणे, त्यांनी घरातील वस्तूची नासधूस करणे, स्वत:ला किंवा इतरांना त्रास होईल, अशा प्रकारचे वर्तन करत असल्याचे या व्हिडिओत दिसते. मुले ‘टॅबलेट’विना जेवतात, झोपतात, असे क्वचितच पहायला मिळते. कामावर जाऊन थकून घरी येणारे आई-वडील ‘टॅबलेट’ देऊन मुलांना गुंतवून ठेवत त्यांचे काम ‘टॅबलेट’सह ‘शेअर’ करतात !
‘टॅबलेट’ वापरणारी मुले हाताबाहेर गेली आहेत. कित्येक लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष नसतांनाही झोपेत ते तो हाताळत असल्याप्रमाणे त्यांच्या बोटांच्या हालचाली चालू असतात. ‘टॅबलेट’चा बोटांशी येत असलेल्या संपर्कामुळे लिखाणाच्या दृष्टीने मुलांचे स्नायू सिद्ध होण्यात अडथळा निर्माण होत आहे. लिखाणासाठी आवश्यक तेवढी शक्ती मुलांच्या हातात नसल्याचे लक्षात आले. लिखाण, चित्र काढणे, रंगवणे हे ‘टॅबलेट’वरच होत असल्याने हाताला त्या दृष्टीने वळण लागले नाही. माणसांपेक्षा यंत्राशी संबंध अधिक आल्याने ही मुले कौटुंबिक, मानसिक आणि सामाजिक भावना यांपासून दूर गेली आहेत. यामुळे व्यक्तीला आदर देणे, एखादी गोष्ट मिळण्यासाठी धीर धरणे, नकार पचवणे, शांत रहाणे त्यांना अवघड होते. इंटरनेटच्या माध्यमातून नकळत्या वयात अनेक गोष्टी कळू लागल्याने मनावर विपरीत परिणाम होत आहे.
जोपर्यंत मानव यंत्राचा वापर करत असतो, तोपर्यंत ठीक असते; मात्र जेव्हा यंत्र मानवाचा वापर करू लागते, तेव्हा विनाश उद्भवतो. त्यामुळे मुलांनी ‘टॅबलेट’ किंवा भ्रमणभाष वापरण्याविषयी पालकांनी वेळीच सतर्क, जागरूक आणि जागृत व्हायला हवे. मुलांचे पर्यायाने कुटुंब, समाज, राष्ट्र, धर्म यांची अंध:कारमय भविष्याकडे होणारी वाटचाल प्रकाशमय मार्गावर करायला हवी. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात नेणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नात्याने संवाद साधणे, त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, मैदानी खेळातून शारीरिक क्षमता वाढवणे, धार्मिक संस्कारांच्या आधारे त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे, असे केले, तर ते सुसंस्कारी होऊन पुढील चांगल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी.