पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
कोण कुणाला सुखी केलं । क्षणासाठी तेही घडलं ।। १ ।।
सुख एक असे कल्पना । हवी हवी वाटे सर्वांना ।। २ ।।
होईल जेव्हा ईश्वरप्राप्ती । तेव्हा होते दुःख समाप्ती ।। ३ ।।
गुरुविना ज्ञान लाभेना । ज्ञानाविना अज्ञान जाईना ।। ४ ।।
ज्ञानप्राप्त झाल्याविना । ईश्वराची प्राप्ती होईना ।। ५ ।।
धोंडिबा म्हणे हे संत । भूलोकीचे भगवंत ।। ६ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)