कुणालाही चोरीचा पश्चात्ताप नसतो, तर चोरीचे अपेक्षित फळ न मिळाल्याचा पश्चात्ताप असतो !

सध्या गोव्यात पूजा नाईक प्रकरण गाजते आहे. (पूजा नाईक यांनी गोव्यातील ४४ जणांना सरकारी नोकरी मिळवून देण्याविषयी सांगत त्यांच्याकडून ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली आहे.) पूजा नाईकवर कारवाई होत आहे, ही योग्यच गोष्ट आहे; पण ज्यांनी नोकरी मिळवण्यासाठी पूजा नाईकला पैसे दिले, ते काही सभ्य नाहीत. ते दुसर्‍यांचा न्याय्य हक्क डावलून स्वतः नोकरीत घुसायला पहात होते. पैसे देऊन काम विकत घेऊ पहाणार्‍या मंडळींनी नोकरीत गेल्यावर काय केले असते ? साहजिक आहे, त्यांनी भ्रष्टाचार करून पूजाला दिलेले पैसे वसूल केले असते. ज्यांनी पैसे दिले त्यांना आपण पैसे दिले, याची ना लाज वाटत आहे, ना आपण पाप केले असे वाटत आहे. त्यांचे दुःख एवढेच आहे की, त्यांच्या भ्रष्ट व्यवहाराला परतावा मिळाला नाही.

पूजा नाईक

या निमित्ताने खलिल जिब्रानची एक बोधकथा आठवते. एकदा एक शेतकरी एका रात्री आपल्या शेजारच्या शेतकर्‍याच्या मळ्यात शिरला. त्या मळ्यात टरबूजे लावलेली होती. रात्रीच्या त्या अंधारात त्या शेतकर्‍याला जे टरबूज मोठे पिकलेले आहे, असे वाटले, ते घेऊन तो आपल्या घरी आला. घरी आल्या आल्या मोठ्या आशेने त्याने ते टरबूज कापले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, ‘ते टरबूज खराब आहे. आपण चोरून आणलेले टरबूज खराब निघाले, हे पाहून त्याला मोठा पश्चात्ताप झाला. आपण उगाचच चोरीचे पाप केले’, असे त्याला वाटले. ही गोष्ट सांगून खलिल जिब्रान एक मार्मिक प्रश्न विचारतो, ‘ते टरबूज खराब नसते. चांगले रसरशीत असते, तर त्या चोराला चोरीचा पश्चात्ताप झाला असता का ?’

महत्त्वाचे लक्षात घ्या, ‘लोकांना चोरीचा पश्चात्ताप नसतो. चोरीचे अपेक्षित फळ न मिळाल्याचा पश्चात्ताप असतो !’

(साभार : संकेतस्थळ)