संपादकीय : रशियाचा जन्मदर वाढवण्याचा निर्णय !
रशिया आणि युक्रेन यांच्यात गत २ वर्षांपासून युद्ध चालू आहे. रशिया युक्रेनचा पाडाव करण्यावर ठाम आहे, तर युक्रेन रशियासमोर झुकायला सिद्ध नाही. दोन्ही बाजूंकडील सैनिक तसे पाहिले, तर पूर्वीच्या मूळ सोव्हियत युनियनचाच भाग आहेत. रशियाकडे आधुनिक युद्धसामुग्री, शस्त्रे असली, तरी युक्रेनच्या सैनिकांना युरोप आणि अमेरिका येथून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा सातत्याने पुरवठा होत असल्याने रशियाचे सैनिक मारले जात आहेत. युद्ध चालू झाल्यापासून रशियाचे अनुमाने १ लाख सैनिक मारले गेले आहेत. हा अंदाज असून प्रत्यक्ष आकडा मोठा असू शकतो. त्या व्यतिरिक्त कित्येक सैनिक जायबंदी झाले आहेत. परिणामी रशियाच्या लोकांना सैन्यामध्ये भरती व्हावे लागत आहे. देशाचे तरुण युद्धात गुंतल्यामुळे आणि अधिकाधिक लोकांना सैन्यात भरती व्हावे लागत असल्याने तरुण लोकसंख्येचा असमतोल रशियात जाणवू लागला आहे. एक पिढी युद्धात गुंतल्याने नवीन पिढी वेगाने वाढणे आणि आधीच्या सैनिकांची जागा भरून काढणे आवश्यक आहे. परिणामी रशियाने लोकसंख्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने रशियाने ‘सेक्स मंत्रालय’ चालू करण्याचा विचार केला आहे.
रशियाची सिद्धता !
या मंत्रालयाचा मुख्य उद्देश स्त्री-पुरुष जोडप्यांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त करणे, त्यासाठी सोयीसुविधा, सवलती उपलब्ध करून देणे, हा आहे. या मंत्रालयाने काही सुविधा आताच घोषितही केल्या आहेत. त्या अंतर्गत वयाच्या २४ वर्षांच्या आत स्त्रीने मूल जन्माला घातल्यास तिला ९ लाख रुपये सरकारकडून देण्यात येतील. त्यानंतर मुलाला वाढवण्यासाठी तिला नोकरी करावी न लागता तिला घरच्या घरी ठराविक रक्कम आणि काही सवलती देण्यात येतील. मूल वाढेपर्यंत या सवलती देण्यात येतील. त्याचप्रमाणे मुले-मुली यांना एकत्र फिरायला जाण्यासाठी काही सवलती, त्यानंतर २ मुले जन्माला घालण्यासाठी सवलती, रात्री १० ते २ या वेळेत देशातील इंटरनेट सेवा बंद ठेवणे अशा विविध सवलतींचा अंतर्भाव आहे. रशियाने घोषित केलेल्या या सुविधांवरूनच किती टप्प्यापर्यंत रशिया नियोजन करत आहे, हे लक्षात येते. आगामी काळातील तिसर्या महायुद्धाच्या दृष्टीनेही मनुष्यबळाची कमतरता राहू नये, यासाठी रशिया आतापासूनच प्रयत्न करत आहे. काही मासांपूर्वी बाहेरच्या देशातून कामगार म्हणून आलेल्या वा कामाच्या नावाखाली आणलेल्यांना रशियाच्या सैन्यात भरती करण्यात आले. कामगारांना सैन्यात भरती केल्यामुळे रशियावर टीकाही झाली. भारतीय कामगारांना सहभागी करून घेतल्यामुळे भारतानेही रशियाकडे आक्षेप नोंदवून सैन्यातील कामगारांना पुन्हा देशात पाठवण्यास सांगितले होते. रशियाच्या प्रशासनाने मात्र त्याला ‘भारतीय कामगारांविषयी माहिती नव्हते’, असे सांगून त्यांना पुन्हा पाठवण्याचे मान्य केले. रशियावर कामगारांना सैन्यात भरती करण्याची वेळ आली, यातून तरुण लोकसंख्येच्या समस्येची स्थिती लक्षात येते.
युद्धामुळे निर्माण होणार्या समस्या !
रशियातील सैनिक दीर्घकाळ कुटुंबापासून दूर असल्यामुळे त्यांच्या पत्नींनी त्यांना पुन्हा घरी पाठवण्यासाठी आंदोलनही केले होते. परिणामी रशियाला घरातूनच पुष्कळ विरोध होऊन युद्ध थांबवावे लागते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. साहजिकच याचा दबाव राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर आहेच; कारण युद्ध चालू झाल्यानंतर ते अधिक काळ चालल्यास देशातील सर्वच गोष्टींवर त्याचा हळूहळू आणि काही वेळा वेगाने परिणाम होऊ लागतो. देशातील घटलेले उत्पादन, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, अनेक कारखाने युद्धसामुग्रीचे उत्पादन करण्यास लावल्यामुळे साधनसंपत्तीचा होणारा अधिक विनियोग आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे युद्धात मृत्यू पडणारे सैनिक अन् यामुळे निर्माण होणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी पोकळी या सर्वांची उणीव जाणवणारच ! प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी २ दशकांचा कालावधी खर्ची होत असल्याने हा सर्व विचार करून युद्धाचे निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा एखाद्या देशाने दुसर्या देशावर आक्रमण केल्यानंतरची तात्कालिक प्रतिक्रिया असू शकते; मात्र जेथे स्वत:हून युद्ध चालू केले जाते, त्या देशाला पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा लागतो. रशियाने ज्या त्वेषाने युद्ध चालू केले, तेव्हा त्याला स्वत:लाही ‘एवढा दीर्घकाळ युद्ध चालेल’, असे वाटले नसेल. हवाईमार्गे विमानांद्वारे बाँब टाकून, क्षेपणास्त्र डागून आणि शेवटी प्रत्यक्ष सैन्य घुसवून रशियाने युक्रेनची पुष्कळ मोठ्या प्रमाणात हानी केली, तरी नंतर मात्र त्याला युक्रेनकडून झालेल्या हानीमुळे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थाची आवश्यकता भासू लागली. एकीकडे हे युद्ध चालू असतांना दुसरीकडे इस्रायलचे हमास, हिजबुल्ला, हुती या जिहादी संघटना आणि इराण यांच्याशी युद्ध चालू आहे. इस्रायलवर हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने प्रतिआक्रमण करून चालू केलेले युद्ध १ वर्ष होऊनही अद्याप चालूच आहे. यामध्ये इस्रायलच्या सैनिकांनाही वीरमरण येत आहे. परिणामी इस्रायलकडेही मनुष्यबळाची कमतरता निर्माण होत आहे. परिणामी त्यांनी भारताकडे त्यांच्याकडील अनेक तांत्रिक आणि घरगुती कामे करण्यासाठी १ लाख कामगारांची मागणी केली होती.
भारताने विचार करणे आवश्यक !
रशियासारख्या मोठ्या देशावरही ‘सेक्स मंत्रालय’ चालू करण्याची वेळ आली, तर ‘आपल्यावर ती वेळ येणार नाही’, असा विचार करायला नको. भारताची लोकसंख्या अधिक असली आणि भारताचे सैन्य जगात दुसर्या क्रमांकाचे असले, तरी भारताशेजारी पाकिस्तान, चीन असे शत्रू आणि वरकरणी मित्र वाटणारे; मात्र शत्रूवत व्यवहार करणारे बांगलादेश, श्रीलंका यांसारखे देश आहेत. भारताच्या पुढे आणखी एक धोका, म्हणजे वर्ष २०५० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या जगात सर्वाधिक असणार आहे. आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहिला, तर भारतावर जेव्हा परकीय आक्रमणे होतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते काफीर हिंदूंवरील आक्रमण असल्याने त्यातील बहुतांश जण एकमेकांना साहाय्य करतात आणि परिणामी भारताची अंतर्गत व्यवस्था एकदम खिळखिळी होऊन जाते. महत्त्वाचे म्हणजे हिंदू असुरक्षित अन् संकटग्रस्त होऊन जातात. आपल्याकडे लोकसंख्या आहे; मात्र ती प्रशिक्षित नाही. धर्मांधांच्या वृत्तीतच हिंसाचार असल्याने त्यांना त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. भारतातील हिंदूंचा प्रजनन दर घटत आहे. त्यामुळे ‘हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत’, असे सांगितले जाते. भारताला आताच लोकसंख्या पुष्कळ भार झालेली आहे. लोकसंख्येवर नियंत्रणच ठेवायचे असेल, तर धर्मांधांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
युद्धामुळे घटणार्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार युद्ध चालू होण्यापूर्वीच करून त्याचे नियोजन करणेही आवश्यक ! |