विजय खर्या लढवय्याचा…!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय हा त्यांच्या अद्वितीय लढाऊ वृत्तीचा विजय आहे. त्यांच्या विरुद्ध उभी राहिलेली महाशक्तीशाली युती कुणालाही धडकी भरवेल, अशीच होती.
१. डॉनल्ड ट्रम्प यांना हरवण्यासाठी ‘डीप स्टेट’सह विविध विरोधकांनी केलेले प्रयत्न
(टीप : ‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.)
राक्षसी आर्थिक शक्ती असलेली, आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जायची सिद्धता असलेली पाताळयंत्री ‘डीप स्टेट’ ! संपूर्ण जगाच्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवणार्या ‘गूगल’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉटस्ॲप’ या ‘मोठ्या तंत्रज्ञान’ कंपन्या…ज्यांनी निष्पक्षपाती वार्तांकन करण्याचे स्वतःचे उत्तरदायित्व गुंडाळून ठेवले. कमला हॅरिस यांना उघडपणे ‘एंडॉर्स’ (समर्थन) केले ती ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सी.एन्.एन्.’ यांसारखी मिडिया हाऊसेस (प्रसिद्धीमाध्यमे)… विद्यापिठे, हॉलीवूड, तथाकथित ‘इंटेलेक्चुअल्स’ (बुद्धीमान), ‘सेलिब्रिटीज’ (वलयांकित व्यक्ती) यांच्यावर हुकूमत गाजवणारी सांस्कृतिक मार्क्सवादी ‘वोक लॉबी’… या सगळ्यांचे शत्रू क्रमांक १ होते डॉनल्ड ट्रम्प ! (वोक लॉबी, म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृत टोळी !)
ट्रम्प यांना संपवण्यासाठी या ‘लॉबी’ने काहीही करायचे बाकी ठेवले नाही. ‘अमानवी राक्षस नाही, तर हास्यास्पद विदूषक’, अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्यावर एका मागून एक खटले भरून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक माध्यमांवरून त्यांना हद्दपार केले. सामान्य माणसासाठीही सामाजिक माध्यमांवर नसणे, म्हणजे सामाजिक अस्तित्वच नसल्यासारखे ! आजच्या जगात राजकीय नेत्यासाठी तर सामाजिक माध्यमांवरची उपस्थिती म्हणजे प्राणवायूच. तोही बंद झाला. शेवटी तर गोळ्या घालून ट्रम्प यांना संपवण्याचाही प्रयत्न झाला. जनमताचा कल हॅरिस यांच्याकडे असल्याचे सर्वेक्षणही प्रसिद्ध केले गेले. या सगळ्यांवर मात करून ट्रम्प यांनी आज मिळवलेला दैदीप्यमान विजय थक्क करणारा आहे. त्यांनी हॅरिस यांना तर चारीमुंड्या चित केलेच; पण रिपब्लिकन पक्षाला ‘सिनेट’ (अधिसभा) आणि ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’(प्रतिनिधींचे सभागृह) यांमध्ये विजय मिळवून दिला.
२. ‘अमेरिका प्रथम’ या भूमिकेमुळे ट्रम्प यांना अमेरिकन जनतेची साथ
आता ‘डीप स्टेट’च्या मांडीवर बसलेल्या बराक ओबामा, क्लिंटन, जो बायडेन यांच्या ढवळाढवळीविना त्यांना कारभार करता येईल. श्रीमंत, उच्चभ्रू लोकांच्या ‘वोक लॉबी’ने ज्यांना मूर्ख ठरवले. अमेरिकेतील मध्यमवर्गीय, गरीब जनता कुठल्याही दबावाखाली न येता वा अपप्रचाराला न फसता ट्रम्प यांच्यामागे ठामपणे उभी राहिल्यामुळेच ते हा चमत्कार घडवू शकले. ‘वोक लॉबी’कडून सतत होत असलेली स्वतःचा धर्म, स्वतःचा देश, स्वतःची संस्कृती यांची अपकीर्ती आणि टिंगल असह्य झाल्यामुळेच देव, देश अन् धर्म यांची चाड असलेल्या या सर्वसामान्य जनतेने ‘अमेरिका फर्स्ट’ (अमेरिका प्रथम) ही भूमिका घेणार्या ट्रम्प यांना भक्कम साथ दिली.
३. ट्रम्प यांच्या विजयामुळे कुणाकुणाला चाप बसेल ?
ट्रम्प यांच्या विजयामुळे जगाला पोखरणार्या साम्यवादी ‘वोक’ वाळवीला आळा बसेल. आपल्याला नको असलेली सरकारे उलथवून टाकण्याचे बांगलादेशासारखे प्रकार बंद होतील. ‘नेशन फर्स्ट’ (राष्ट्र प्रथम), अशी राष्ट्रवादी भूमिका घेणार्या नेत्यांना बळ मिळेल. चीनच्या विस्तारवादाला चाप बसेल. युक्रेनला भानावर यावे लागेल. अमेरिकेची युद्धखोरी न्यून होईल. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासारखे पप्पू आणि त्यांना भरीला घालणारे आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोससारखे अराजकतावादी यांना मोकळे रान मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे खलिस्तानी, जिहादी यांना हाताशी धरून भारताला अस्थिर करणे अवघड होईल.
स्वतःच्या कारकीर्दीच्या दुसर्या आणि शेवटच्या ४ वर्षांत ‘ट्रम्प यांनी अराजक आणि विध्वंस यांच्या टोकावर उभ्या असलेल्या जगाला स्थैर्य, शांती आणि प्रगती यांच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न करावा अन् त्यात त्यांना यश मिळावे’, हीच शुभेच्छा संपूर्ण जग त्यांना आज देत असेल.
जागतिक वर्चस्वाची स्वप्ने बघणार्या ‘डीप स्टेट’, सांस्कृतिक मार्क्सवादी आणि जिहादी या तिन्ही निरंकुशतावादी शक्तींशी एकट्याने लढणार्या अन् त्या विरोधात जिंकणार्या डॉनल्ड ट्रम्प यांचे मनःपूर्वक अभिनंदन करावे तेवढे थोडेच !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (६.११.२०२४)
कमला हॅरिस यांना त्याच राज्यांमध्ये मताधिक्य मिळाले जिथे मतदान करण्यासाठी ओळखपत्र जरूरी नव्हते, म्हणजेच बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या परदेशी नागरिकांच्या मतांवर त्या राज्यांमध्ये हॅरिस यांची सरशी झाली. यासाठीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन किंवा कमला हॅरिस यांनी गेली ४ वर्षे ‘ओपन बॉर्डर’ (खुल्या सीमा) धोरणाचा अवलंब केला होता. भारताच्या सीमेपलीकडून बेकायदेशीर घुसखोरांना खुली सूट देणारे, वर त्यांना त्वरेने आधार कार्ड आणि शिधापत्रक (रेशनकार्ड) मिळवून देणारे बायडेन किंवा कमला हॅरिस यांचे भाऊबंद कोण आहेत, हे आपण जाणतोच !
– श्री. अभिजित जोग
संपादकीय भूमिकाभारतात बेकायदेशीर घुसखोरांना आश्रय देण्यासाठी साहाय्य करणार्यांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ? |