आनंदी, प्रेमळ आणि सेवाभाव असलेले चिंचवड (पुणे) येथील कै. प्रतीक मधुकर नेवसे !
चिंचवड (पुणे) येथील साधिका श्रीमती प्रभा नेवसे यांचा मुलगा प्रतीक मधुकर नेवसे (वय २९ वर्षे) यांचे ३०.७.२०२३ या दिवशी निधन झाले. श्रीमती प्रभा नेवसे यांना प्रतीक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्याचा सांभाळ करतांना आलेल्या अनुभूती आणि त्याला झालेले शारीरिक त्रास पुढे दिले आहेत.
१. प्रतीक नेवसे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. आनंदी : ‘प्रतीक नेहमी प्रसन्न आणि आनंदी असायचा. त्याचे हास्य पाहून पुष्कळ आनंद वाटायचा.
१ आ. प्रेमळ : साधक ‘सनातन प्रभात’चे अंक घेऊन घरी आले की, प्रतीक त्यांना पाणी द्यायचा. ‘साधकांसाठी चहा कर’, असे तो मला म्हणायचा. त्याने वसाहतीमधील लोकांचेही मन जिंकले होते.
१ इ. सेवाभाव : तो प्रतिदिन घराजवळच्या दत्तमंदिरात जात असे. देवाला प्रदक्षिणा घालून झाल्यावर तो तेथील ‘स्वच्छता करणे, सतरंजीची घडी घालणे, भाविकांनी आणलेले हार आणि फुले देवापुढे नेऊन ठेवणे, देवळातील आसंद्या पुसून नीट ठेवणे, वयस्कर व्यक्तींना बसायला सांगणे, मूर्तीचे वस्त्र धुणे, आरतीच्या वेळी सर्वांना फुले देणे, घंटा वाजवणे’ इत्यादी सेवा करत असे. प्रतीक रस्त्यावरून जाणार्या प्रत्येकाला आरतीला बोलवत असे. त्यामुळे मंदिरात आरतीला येणार्यांची संख्या वाढली.
२. विविध कठीण प्रसंगांत भगवंतानेच मुलाची काळजी घेतल्याची अनुभूती येणे
अ. ‘११.११.१९९४ या दिवशी प्रतीकचा जन्म झाला. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी आम्हाला ‘मुलगा मतीमंद असून त्याला सांभाळणे पुष्कळ कष्टाचे होईल.’’ दीड वर्षाचा होईपर्यंत प्रतीक चालत नव्हता. त्या वेळी मी त्याला पुण्यातील लिमये महाराज यांच्याकडे स्नेहन (औषधी तेलाने मर्दन) करण्यासाठी नेत होते. त्यानंतर तो चालू लागला.
आ. अनेक वेळा मी स्वयंपाक करत असतांना तो घराचे दार उघडून घराबाहेर जात असे. घराशेजारी असलेल्या गिरणीवाल्या काकांचे त्याच्याकडे लक्ष असायचे. ते काका ‘प्रतीक कोणत्या दिशेला गेला आहे ?’, हे मला सांगायचे. त्यामुळे मला त्याला शोधून आणता येत असे. अशा अनेक प्रसंगांत ‘भगवंत पाठीशी आहे’, ही अनुभूती मला घेता आली.
३. प्रतीक यांना झालेले शारीरिक त्रास
अ. वर्ष २०२० मध्ये प्रतीकला पोटाचा अंतर्गळ (हार्निया) (टीप) झाला होता. १८.९.२०२० या दिवशी आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करून ती गाठ काढली. त्यानंतर २ वर्षांनी पुन्हा त्याचा त्रास वाढला होता. तेव्हा आयुर्वेदीय उपचारांसह आध्यात्मिक स्तरावरील उपायही चालू होते.
टीप – अंतर्गळ (हार्निया) : पोटातील आतड्यासारख्या अवयवाचा काही भाग त्वचा आणि स्नायू यांच्या मधल्या भागात पोटाच्या स्नायूंच्या भिंतींमधून बाहेर येणे
आ. मी अष्टविनायक यात्रेहून परत आल्यानंतर प्रतीकला माझ्या बहिणीकडून घेऊन येत असतांना वाटेत त्याला खाऊ घातले. त्यानंतर २ दिवसांनी त्याला ‘उलट्या, जुलाब आणि सतत उचकी लागणे’, असे त्रास होऊ लागले. ‘सलाईन’ लावल्यावर उचक्यांचे प्रमाण थांबले. त्या वेळी त्याचे पोट फुगलेले असायचे. त्यामुळे तो सतत झोपून रहात असे. आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर प्रतीकला छातीचा हार्निया झाल्याचे निदान झाले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘हे शस्त्रकर्म कठीण असून त्याला ते सोसवणार नाही. पोटात पाणी झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागेल’, असे आम्हाला सांगितले.
४. निधन
रुग्णालयात जाण्यासाठी घरातून निघतांना प्रतीकने त्याचा नेहमी वापरायचा पांढरा सदरा आणि पायजमा यांवरून प्रेमाने हात फिरवला. रुग्णालयात गेल्यावर त्याने त्याच्या मोठ्या भावाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आता मी जातो.’’ त्यानंतर तो शांतपणे झोपला. दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
‘प्रतीकचा पुढचा प्रवास चांगला होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते. ‘गुरुदेवांनी माझ्याकडून प्रतीकची सेवा करून घेतली आणि त्यासाठी मला बळ दिले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती प्रभा मधुकर नेवसे (कै. प्रतीक याची आई), तानाजीनगर, चिंचवड, पुणे. (१८.८.२०२४)