समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिल्यावरून ब्रिगेडी मंडळींना पोटशूळ !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते विधान !
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील निवडणूक प्रचाराच्या सभेत समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ब्रिगेडी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
‘समर्थ रामदासस्वामी यांचे पाऊल जिथे पडले, ती ही पवित्र भूमी आहे. रामदासस्वामी यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले’, असे वक्तव्य अमित शहा यांनी बत्तीस शिराळा येथील सभेत केले होते. यावर ब्रिगेडी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी वर्ष १६४२ ते १६७२ या कालखंडात शिवाजी महाराज यांच्या विषयी समर्थ रामदासस्वामी यांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदवलेले नाही. रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांकडे जाऊन पाठिंबा द्यायला सांगितला, ही भाकड कथा असल्याचे म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी समर्थ रामदासस्वामी यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे; मात्र त्यांनी महाराजांना पाठिंबा दिल्याचा इतिहास चुकीचा आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राचा योग्य अभ्यास करून भाषण करावे.’’ (हिंदवी स्वराज्याच्या सेनेत तरुणांनी सहभागी व्हावे, यासाठी समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ व्यायामशाळा महाराष्ट्रात अद्यापही आहेत. ब्राह्मणद्वेषामुळे ही मंडळी समर्थ रामदासस्वामी यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील योगदान नाकारतात; मात्र छत्रपती शिवाजी महाराज कसे मुसलमानप्रेमी होते, हे दाखवण्याचा प्रयत्न करणार्या खोट्या इतिहासाविषयी मात्र ही मंडळी गप्प रहातात ! – संपादक)