सेवाभाव असणारे इचलकरंजी येथील श्री. सदाशिव जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८९ वर्षे) !
४.११.२०२४ या दिवशी श्री. सदाशिव जाधवकाकांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. काका आणि त्यांच्या पत्नी सौ. रंजनी जाधवकाकू गुरूंवर अढळ निष्ठा ठेवून साधना करत आहेत. श्री. अविनाश जाधव आणि अन्य साधकांना श्री. सदाशिव जाधकाका यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव : ‘श्री. सदाशिव जाधवकाका आणि सौ. रंजनी जाधवकाकू त्यांच्याकडे येणार्यांची आपुलकीने विचारपूस करतात. जेवणाच्या वेळी त्यांच्या घरी कोणी आले, तर ते त्यांना जेवण्याचाही आग्रह करतात. प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आढावा ऐकून काकांना आनंद होतो.
२. साधकांना आधार देणे : काही साधक काकांना आपल्या अडचणी सांगतात. त्या वेळी काका त्यांना ‘हेही दिवस जातील आणि नक्कीच चांगले दिवस येतील. वाईटाकडे दुर्लक्ष करून परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून साधना करायची, नामजप करायचा’, असे सांगून धीर देतात. त्यामुळे काकांचा साधकांना आधार वाटतो.
३. सेवाभाव
अ. वर्ष १९९७ मध्ये इचलकरंजीत सनातन संस्थेच्या कार्याला प्रारंभ झाला. काकांचे घर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काकांनी साधक आणि सनातन संस्थेचे कार्य यांसाठी त्यांचे घर उपलब्ध करून दिले.
आ. अध्यात्मप्रसाराच्या उद्देशाने पूर्वी काढल्या जाणार्या प्रभातफेर्या आणि नामदिंड्या यांमध्ये काका सहभागी होत असत आणि अन्य साधकांनाही सहभागी होण्यास सांगत असत.
इ. काका अर्पण गोळा करणे, ग्रंथ आणि ध्वनीफिती इत्यादी साहित्याचा हिशोब ठेवणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आल्यावर त्यांचे विभागवार वर्गीकरण करणे इत्यादी सेवा करत असत. ५.२.१९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यापासून काका त्याच्याशी संबंधित सेवा करत आहेत.
ई. वयस्कर असूनही ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करून साधकांसाठी असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतात.
उ. वयोमानानुसार काकांना शारीरिक कष्ट घेऊन फार काही करता येत नाही; मात्र ते संस्थास्तरावर सांगितलेला नामजप करतात.
४. गुरूंप्रती भाव : एकदा काका कोल्हापूर येथे ग्रंथांसंबंधी सेवा करून रात्री दुचाकीवरून इचलकरंजीला परत येत होते. तेव्हा मार्गावर चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात काका जखमी झाले. याविषयी ते म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच मी घरी सुखरूप पोचलो.’’ त्यांना अमरनाथ येथे दर्शनाच्या वेळी बर्फाच्या लिंगाजवळ प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी काकांना ‘दर्शन घ्या’, असे सांगितले. तेव्हा त्यांचा आणि काकूंचा भाव जागृत झाला.’
श्रीमती दीपश्री जाधव (श्री. सदाशिव जाधव यांची सर्वांत लहान मुलगी), सांगली.
१. ‘बाबांना वाचण्याची आणि फिरण्याची पुष्कळ आवड आहे. त्यांनी अध्यात्मातील अनेक ग्रंथांचे वाचन केले आहे. त्यांनी दक्षिण भारतातील धार्मिक स्थळे, तसेच काशी, रामेश्वर इत्यादी तीर्थक्षेत्री तीर्थयात्रा केल्या आहेत.
२. अलीकडेच बाबांच्या काही शारीरिक चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांच्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आले. तेव्हा बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
३. बाबा एक साधे, सरळ, एकमार्गी आणि मितभाषी असे व्यक्तीमत्व आहे.
‘बाबांच्या पाठीशी गुरुदेव सदैव रहावेत आणि बाबांना दीर्घायुष्य लाभो’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’
श्रीमती प्रतिभा दिलीप बगाडे, नवे पारगाव, कोल्हापूर
१. ‘जाधवकाकांनी साधकांच्या मनात साधनेचे महत्त्व बिंबवले आणि ‘गुरुचरणांशी कसे रहावे ?’, याविषयी शिकवले.’
श्री. पुंडलिक रेळेकर आणि सौ. शशिकला रेळेकर, इचलकरंजी
१. ‘काका सतत हसतमुख असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटते.
२. त्यांच्याकडे पहाताक्षणी माझा नामजप चालू होऊन भाव जागृत होतो. त्यांचे नामस्मरण सतत चालू असते.
३. आम्ही काकांना भेटायला गेल्यावर ते मायेतील न बोलता साधनेविषयीच बोलतात.’
सौ. हेमा रणदिवे आणि श्री. रजनीकांत रणदिवे, इचलकरंजी, कोल्हापूर
१. ‘काका प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात.
२. काका आम्हा साधकांवर पुत्रवत् प्रेम करतात. त्यामुळे ते आम्हाला वडिलांसारखे वाटतात.
३. काकांची परात्पर गुरु डॉक्टरांवर प्रबळ श्रद्धा आहे. त्यामुळे काका कठीण प्रसंगात डगमगले नाहीत.’
सौ. वैशाली सुरेश रणदिवे, इचलकरंजी, कोल्हापूर
१. ‘काका वेळेचे पालन करतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत.
२. काकांची व्यष्टी साधना कधीही खंडित होत नाही. सध्या ते ५ ते ६ घंटे नामजप करतात.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २५.१०.२०२४)