मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘राज्य मराठी विकास संस्था’ !
‘माझिया मराठीचे नगरी…’
‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आतापर्यंत आपण महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणार्या ‘भाषा संचालनालया’च्या कार्याची माहिती पाहिली, तसेच मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळण्यासाठी झालेले प्रयत्न आणि आता यापुढे मराठी भाषेसाठी काम करणार्यांवर असणारे दायित्व यांविषयी पाहिले. आज आपण शासनाच्या अंतर्गत येणार्या मराठी भाषेसाठी काम करणार्या दुसर्या एका संस्थेची, म्हणजे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती थोडक्यात जाणून घेऊ.
शासकीय स्तरावर मराठी भाषेच्या दृष्टीने काय प्रयत्न होतात ?, हे आपल्याला ठाऊक नसते. शासकीय स्तरावरील मराठी भाषेच्या कामकाजाची तोंडओळख येथे देण्यामागचा उद्देश हा आहे की, या संदर्भात सर्वसामान्य जनता मराठीच्या वापरासाठी त्याचा लाभ कसा करून घेऊ शकते ? हे पाहू शकते, तसेच त्या उपक्रमांमध्ये वृद्धी किंवा सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा मराठीच्या संवर्धनासाठी तत्सम उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने शासनाला काही सुचवू शकते.
(भाग १)
१. स्थापना आणि उद्देश
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन अन् संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १ मे १९९२ या दिवशी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना केली. १ मे १९९३ पासून संस्थेच्या कामकाजास प्रत्यक्ष आरंभ झाला.
‘विविध क्षेत्रांत मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान व्हावी’, या उद्देशांनी ही संस्था काम करते. भाषा आणि संस्कृती यांच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणार्या विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये समन्वय ठेवून त्या संस्थांच्या साहाय्याने विविध उपक्रम ही संस्था पार पाडते. शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणार्या या संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संस्थेचे अध्यक्ष आणि मराठी भाषेचे मंत्री हे उपाध्यक्ष असतात. सध्या मंडळावर एकूण २१ अशासकीय सदस्य कार्यरत आहेत. आतापर्यंत संस्थेने पुढील काही उपक्रम राबवले आहेत. सध्या राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक म्हणून सध्या डॉ. शामकांत देवरे हे काम पहातात.
२. अमराठी भाषिकांसाठी उपक्रम
‘मराठी भाषेचा ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून विकास करणे’, हे संस्थेचे ध्येय आहे. अमराठी समाजगटांना मराठी भाषा आणि संस्कृती यांच्याविषयी श्रद्धा अन् रूची निर्माण व्हावी, म्हणून विविध साधने विकसित करण्यात येत आहेत. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापिठाचा जर्मन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अन्य भाषिकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी गुणवत्तापूर्ण अध्यापन-सामुग्री निर्माण करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे.
अमराठी भाषिकांना आधुनिक पद्धतीने मराठी शिकवणारा अभ्यासक्रम संस्थेने सिद्ध केला आहे. या अभ्यासक्रमात अमराठींना भाषा शिकण्यासाठी लागणार्या गोष्टींचा तपशीलवार विचार करून यासाठी आवश्यक अशी पाठ्य आणि अभ्यास पुस्तकेही सिद्ध केली आहेत. अमराठी परिचारिका, रिक्शा आणि टॅक्सी चालक, अधिकोषातील कर्मचारी यांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुस्तके आदी सामुग्री मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत रेल्वे अधिकारी, इस्रायल भाषिक आणि जर्मन विद्यार्थी, तसेच तंजावर येथील उच्चशिक्षित संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी मराठी भाषा शिकण्यासाठी वर्ग घेण्यात आले आहेत.
३. लहान मुलांना मराठी शिकवणे
‘आपणच पुणे’ या संस्थेच्या ‘शिकू द्या मुलांना मराठी आनंदाने, प्रेमाने अन् अभिमानाने’, या उपक्रमाच्या अंतर्गत राज्य मराठी विकास संस्थेने लहान मुलांनी भाषा शिकण्याच्या संदर्भात प्रकल्प राबवला.
४. ‘प्रोग्रॅम’ किंवा ‘सॉफ्टवेअर’ यांचे मराठीकरण करणे
मराठीला आधुनिक भाषा बनवण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत् करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. काही ‘प्रोग्रॅम’ (संगणकीय आज्ञावली) किंवा ‘सॉफ्टवेअर’ (आज्ञावली) यांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेद्वारे हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत पुढील आज्ञावल्यांचे (‘प्रोग्रॅम’चे) संगणकीकरण करण्यात येत आहे.
‘गिम्प’ (ग्नू इमेज मॅन्युप्युलेटिंग प्रोग्रॅम) ही छायाचित्रित प्रतिमांचे संपादन करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि ‘ऑड्यासिटी’ ही ध्वनीमुद्रणासाठी अथवा ध्वनीमुद्रित सामग्रीच्या संपादनासाठी वापरण्यात येणारी आज्ञावली (प्रोग्रॅम) आहे. या आज्ञावल्यांचे (‘प्रोग्रॅम’चे) संवादपटल (इंटरफेस), तसेच माहितीपुस्तिका यांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्था अन्य संस्थांच्या माध्यमातून करून घेत आहे.
‘गिम्प’ आज्ञावलीचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प ‘बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठा’च्या संगणकशास्त्र विभागाकडून, तर ‘ऑड्यासिटी’चा प्रकल्प ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीयर कोर्स, पुणे’, यांच्याकडून करून घेण्यात येत आहे.
‘गिम्प’ ही आज्ञावली (https://l10n.gnome.org/teams/mr/) या मार्गिकेवर उपलब्ध आहे. वरील दोन्ही आज्ञावल्या सर्वांसाठी उपलब्ध (मुक्त) असल्याने त्या सर्वांना वापरणे शक्य होते आणि त्यात मराठीचा पर्याय निवडणे आता शक्य होत आहे.
५. वर्हाडी बोलींचा शब्दकोश
महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा ५ जिल्ह्यांमध्ये बोलली जाणारी ‘वर्हाडी बोली’ ही मराठीतील एक महत्त्वाची बोली आहे. या बोलीतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी घटकांचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने वर्हाडी बोलींतील शब्दकोशाचे २ खंड आणि वर्हाडी बोलींतील वाक्प्रचार, तसेच म्हणी यांचा प्रत्येकी १ खंड राज्य मराठी विकास संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येत आहेत. प्रमाण भाषेसमवेत मराठीच्या बोलींच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. हे ४ खंड सर्वांना महाजालावरून पहाण्यासाठी, तसेच विनामूल्य उतरवून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
वर्हा़डी बोलीचे तज्ञ डॉ. विठ्ठल वाघ, ‘साहित्य संस्कृती मंडळ’ आणि ‘श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ’ यांच्या साहाय्याने हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेने राबवला आहे.
६. मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण आणि प्रतिमांकन (डिजिटायझेशन)
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आपल्याला मराठी भाषेचे विविध भाषाभेद आढळतात. या विविध भाषाभेदांना आपण ‘मराठीच्या बोली’ असे म्हणतो.
मराठी भाषेतील या भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवरच्या वैविध्याचे भाषाशास्त्रीय वर्णन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डेक्कन कॉलेज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०१७ पासून ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन’, हा प्रकल्प कार्यरत आहे.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रभर सर्वेक्षण करण्यात येत असून बोलींचे प्रतिमांकन (डिजिटायझेशन) तसेच बोलींतील निवडक शब्दांचे आणि वाक्यस्तरावरील काही विशेषांचे नकाशांच्या स्वरूपात आलेखन (मॅपिंग) करण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचे काम पूर्ण झाले असून त्यात २३१ गावांतील २ सहस्र २८५ मुलाखतींचा समावेश आहे.
हा प्रकल्प म्हणज महाराष्ट्रव्यापी स्वरूपाची ही पहिलीच भाषिक पहाणी आहे. या प्रकल्पांतर्गत एप्रिल २०१८ पासून एकसमान पद्धतीचा अवलंब करून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून भाषिक सामग्री ध्वनीमुद्रित करण्यात येत आहे. भाषा-अभ्यासकांना अतिशय उपयुक्त असा बोलीविशेषांचा समांतर संग्रह (पॅरलल कॉर्पस) या प्रकल्पातून सिद्ध होत आहे.
ही सामग्री मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत https://sdml.ac.in/mr या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.
राज्यातील आद्य साहित्य संस्था ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे नियतकालिक ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ याचेही प्रतिमांकन करण्यात येणार आहे.
७. मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा
मराठी भाषिकांच्या, तसेच विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक जाणिवेत वृद्धी व्हावी, त्यांना मराठी भाषा, साहित्य यांची गोडी लागावी यांसाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या देहली येथील मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या मराठी भाषा, संस्कृती आणि सामान्य ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा यांचे वर्ष २०१८ पासून राज्य मराठी विकास संस्था संयुक्त रितीने आयोजन करते.
८. मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय
राज्य मराठी विकास संस्थेने तिचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय उभारण्यासाठी श्री. श्याम जोशी यांच्या ‘स्वायत्त मराठी विद्यापिठा’ने संकलित केलेला ग्रंथसंचय ऑगस्ट २०१९ मध्ये स्वतःकडे घेतला आहे. या संदर्भ ग्रंथालयात पुस्तके आणि नियतकालिके मिळून एकूण ७६ सहस्र एवढी ग्रंथसंपदा आहे. यात दोलामुद्रिते, दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, नियतकालिके, दिवाळी अंक यांचा समावेश आहे. काही ख्यातनाम वाङ्मयीन नियतकालिकांचे संपूर्ण संच या संदर्भ ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधक यांना या संदर्भ ग्रंथालयातील संदर्भ सेवा सशुल्क उपलब्ध आहे. हे ग्रंथालय तेलवणे टॉवर, पाटीलपाडा, बदलापूर रेल्वेस्थानकासमोर (संपर्क क्र. ९८९२०७२५७२) आहे.
(६.११.२०२४)
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855448.html