देशात उद्रेक करण्याचे कारस्थान रचले जात आहे ! – उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार
कोल्हापूर येथे पत्रकार परिषद
कोल्हापूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – पाश्चात्त्य आणि युरोपीय देशांमध्ये लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकली नाही; मात्र भारत हा एकमेव असा देश आहे की, या देशात इतकी विविधता असूनही तेथे लोकशाही जिवंत आहे. भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहे. ज्यात सामाजिक माध्यमे, तसेच विविध माध्यमांचा वापर करून लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणे, लोकांमध्ये असंतोष निर्माण करणे, लोकांना एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यातून संपूर्ण देशात उद्रेक करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘झी २४ तास’चे माजी संपादक श्री. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. ते ‘प्रेस क्लब’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी श्री. नंदकुमार दिवटे उपस्थित होते.
श्री. उदय निरगुडकर पुढे म्हणाले, ‘‘देशात सामाजिक माध्यमांद्वारे खोटे कथानक पसरवले जात असून कोणतीच व्यवस्था चांगली नाही, कोणताच उमेदवार चांगला नाही, असेही पसरवले जात आहे. आज राज्यघटना धोक्यात असल्याची आवई उठवली जात आहे. खरे पहाता भारतात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये गत वेळी निवडून आलेल्यांपेक्षा ५० टक्के नवीन लोक निवडून येतात. त्यामुळे मतदार जागृत आहेत, असेच म्हणावे लागेल. निवडणुकांमध्ये पैशांचा वापर वाढला आहे, हे जरी खरे असले, तरी निवडणुका केवळ मद्य आणि मांसाहारी भोजन यांची लालूच दाखवून जिंकता येतात हे खरे नाही. त्यामुळे या सर्वांना प्रत्युत्तर देण्यासाठी मतदारांनी सजग होऊन १०० टक्के मतदान केले पाहिजे.’’
मतदारांना ‘विनामूल्य देण्याची संस्कृती’ (फ्रीबीज) देशासाठी घातक !
पंजाबसारख्या सधन राज्यात मतदारांना विविध गोष्टी विनामूल्य देण्यात येत आहेत. त्यामुळे पंजाबची आज दुर्दशा झाली असून काम नसल्याने तेथून तरुण अन्य राज्यात जात आहेत. केरळसारखे सर्वाधिक शिक्षित राज्य मतदारांना विनामूल्य गोष्टी देऊन त्यांचा अतिरेक झाल्याने त्यांच्या तिजोरीत पैसे नसल्याने सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने त्यांना २३ सहस्र कोटी रुपये द्यावेत यांसाठी याचिका प्रविष्ट केली आहे. निवडून येण्यासाठी मतदारांना ‘विनामूल्य देण्याची संस्कृती’ (फ्रीबीज) देशासाठी घातक आहे. मतदारांना विनामूल्य देण्याच्या योजनांमध्ये अनेक राज्ये आज आर्थिक संकटात सापडली आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयानेही राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात असलेली ‘लाडकी बहीण’ योजना मात्र त्याच भाग नाही, असे श्री. निरगुडकर या प्रसंगी म्हणाले.
मतदार जागृती अभियानात ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ सहभागी आहे. त्यातील ‘मी १०० टक्के मतदान करणार’ या शपथपत्राचे श्री. उदय निरगुडकर यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे यांसह विविध पत्रकार उपस्थित होते.
देशातील नैतिक मूल्ये उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न ! – उदय निरगुडकरभारतियांसमोर असलेले आदर्श मोडून काढण्याचे, त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम चालू आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी मातृभाषेतील पहिला शब्दकोष निर्माण केला, त्यांना आज ‘निधर्मी’ ठरवण्याचे कारस्थान चालू आहे. भारतीय संस्कृतीत ज्या गोष्टींना कधीच स्थान नव्हते, अशा गोष्टींची जाणीवपूर्वक चर्चा घडवून इथली नैतिक मूल्ये उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत. |