Qatar to expel Hamas Leaders : अमेरिकेच्या विनंतीनंतर कतारने हमासच्या नेत्यांना देश सोडण्याचा दिला आदेश

दोहा (कतार) – अमेरिकेच्या विनंतीनंतर कतारने जिहादी आतंकवादी संघटना हमासच्या नेत्यांना देश सोडण्यास सांगितले. हमासचे अनेक प्रमुख नेते कतारची राजधानी दोहामध्ये रहातात.

१. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीला अमेरिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी अनुमाने २ आठवड्यांपूर्वी कतारच्या अधिकार्‍यांना कळवले की, ‘राजधानी दोहामध्ये हमासच्या नेत्यांना आश्रय देणे थांबवावे लागेल.’ कतारने आता यास सहमती दर्शवली आहे. त्यांनी एका आठवड्यापूर्वी हमासच्या नेत्यांना देश सोडून जाण्यास सांगितल्याची माहिती प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

२. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, हमास एक आतंकवादी गट आहे, ज्याने अमेरिकी नागरिकांना ठार मारले असून अनेकांना ओलीस ठेवले आहे. ओलिसांच्या सुटकेचे प्रस्तावही त्यांनी वारंवार नाकारले आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या नेत्यांचे यापुढे कोणत्याही अमेरिकी भागीदारांच्या राजधानीत स्वागत केले जाऊ नये.

३. अमेरिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, हमासच्या नेत्यांना देश सोडण्यासाठी फारसा वेळ देण्यात आलेला नाही. ते तुर्कीयेला जाऊ शकतात, असे मानले जाते.

संपादकीय भूमिका

असा आदेश गेल्या काही वर्षांत अमेरिकेकडून देण्यात आला नव्हता, तर तो आताच देण्यात आला आहे. यावरून ‘अमेरिकेत ट्रम्प सरकार येत आहे, त्याचाच हा परिणाम आहे’, हे लक्षात येते !