कार्तिक यात्रेसाठी कोल्हापूर येथून ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन !
कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – १२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ११, १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्यातील विविध आगारांमधून सोडण्यात येणार आहेत. या यात्रेसाठी ४४ अथवा अधिक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून मागणी केल्यास त्यांना पंढरपूर येथे जाण्यासाठी आणि परत गावापर्यंत थेट बस उपलब्ध करून दिली जाईल. या प्रवासात ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी विनामूल्य प्रवास, महिलांना निम्म्या दरात प्रवास या सवलती लागू रहाणार आहेत. त्यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा.
दीपावलीच्या कालावधीत एस्.टी.ला ११ कोटी रुपयांचे उत्पन्न !
दीपावलीच्या कालावधीत म्हणजे २८ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत योग्य नियोजन केल्यामुळे एस्.टी.च्या कोल्हापूर विभागास ११ कोटी ६ लाख ८६ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात एस्.टी.ने ३३ लाख किलोमीटर प्रवास केला. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, बेळगाव या प्रमुख शहरांचा समावेश आहे. अजूनही दीपावलीचा हंगाम चालू असून येणार्या आठवड्यातही एस्.टी.च्या उत्पन्नात वाढ होणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली.