दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दक्षिण मुंबईत सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम जप्त !; सत्ताधार्यांकडून कोट्यवधींच्या उधळपट्टीचा आरोप !…
निवडणूक विशेष
दक्षिण मुंबईत सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम जप्त !
मुंबई – मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांच्या कह्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी १२ संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे. यातील बहुतांश नोटा ५०० रुपयांच्या आहेत.
सत्ताधार्यांकडून कोट्यवधींच्या उधळपट्टीचा आरोप !
डोंबिवली – विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसने १ सहस्र १०० हून अधिक निर्णय घेतले. विकासकामांच्या नावाखाली १ लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आणि नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
आचारसंहिता भंगाच्या ३,११२ तक्रारी निकाली
मुंबई – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ३ सहस्र १२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या !
मुंबई – निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० सहस्र ५२० शाईच्या बाटल्यांची सोय करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.
निवडणुकीसाठी १ लाखांहून अधिक मतदान केंद्रे !
मुंबई – निवडणुकीसाठी राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात ८ सहस्र ४६२ मतदान केंद्रे आहेत.
विधानसभा निवडणुकीचा दैनंदिन कामाला फटका
नवी मुंबई – महापालिकेचे बहुतांश कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेल्याने शहरातील दैनंदिन कामावर त्याचा परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे १ सहस्र २०० हून अधिक कर्मचार्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुपलब्धतेमुळे महापालिकेत येणार्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागते आणि अनेक हेलपाटे मारावे लागतात. यामुळे जनतेच्या कामाचा खोळंबा झाला आहे.