Hike In Mumbai Air Pollution : वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घसरण !
मुंबई – मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वर्ष २०१९ ते २०२२ या ४ वर्षांच्या कालावधीत श्वसनाच्या गंभीर आजारांमुळे तब्बल ३३ सहस्र ७११ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत क्षयरोगामुळे १६ सहस्र ३४५ जणांचा मृत्यूमुखी पडले. आधी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ५१-१०० मध्ये म्हणजे ‘समाधानकारक’ होता. वरील कालावधीत तो १०१-२०० मध्ये म्हणजे ‘मध्यम’पर्यंत खालावला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ०-५० असल्यास तो चांगला समजला जातो; मात्र वर्ष २०२३ पर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’ झालेली नाही, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनच्या वतीने ‘मुंबईतील आरोग्य समस्यांची स्थिती २०२४’ नावाचा हा अहवाल ७ नोव्हेंबर या दिवशी प्रकाशित करण्यात आला.
मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि उपलब्ध आरोग्य कर्मचार्यांची संख्या यांची स्थिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये मुंबईत मधुमेह झालेल्या नागरिकांची संख्या २ सहस्र ४२८ होती; मात्र २०२२ मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती १४ सहस्र २०७ पर्यंत पोचली. वर्ष २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०७ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक’ चालू केली. त्यामधील ९७ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक’ आधीपासून उभ्या असलेल्या दवाखान्यात चालू करण्यात आली आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालामध्ये ‘आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यासाठी हे दवाखाने १४ घंटे चालू ठेवायला हवेत, असे नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाहवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलायला हवीत ! |