India America Relations: (म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध ठेवल्याचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका

अमेरिकेच्या मावळत्या जो बायडेन सरकारचे विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतासमवेत संबंध भक्कम करण्यासाठी बायडेन प्रशासनाला अभिमान आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नावरील उत्तर म्हटले. ते म्हणाले की, ‘क्वाड’च्या (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांची संघटना) माध्यमातून आमचे वाढते सहकार्य आणि अनेक सामायिक प्राधान्यक्रमांमुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ झाले आहेत. हे असे काहीतरी आहे, ज्यावर आम्ही पहिल्या दिवसापासून लक्ष केंद्रित केले आणि आता आम्ही पद सोडण्याच्या सिद्धतेत असतांना त्याकडे एक मोठे यश म्हणून पहातो.

ट्रम्प सरकारच्या काळातही भारताशी चांगले संबंध रहातील ! – तज्ञ

ट्रम्प यांचे सरकार आल्यावर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे असतील ?, यावर तज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेत कुठल्याही पक्षाचे सरकार आले, तरी अमेरिकेचे भारताशी संबंध दृढ रहातील. याचे कारण चीनचा वाढता प्रभाव आणि भारताची वाढती अर्थव्यवस्था आहे. वर्ष २०१६ मध्ये डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हाही त्यांनी भारताशी असलेल्या संबंधांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे ट्रम्प सत्तेत परतल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगले रहातील, अशी अपेक्षा आहे. तथापि ट्रम्प यांचे राजकारण पहाता भारतातही काही समस्या असू शकतात आणि त्यांपैकी आर्थिक संबंधांचे सूत्र सर्वांत महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी अमेरिकेच्या वस्तूंवर भारताने लादलेल्या शुल्काविषयी तक्रार केली होती. ते म्हणाले होते की, जर ते सत्तेवर आले, तर अमेरिकी वस्तूंवर अधिक कर लावणार्‍या देशांवर ते अधिक कर लावतील. आता जर ट्रम्प यांनी अधिक कर लावला, तर त्याचा भारताला फटका बसू शकतो.

संपादकीय भूमिका

‘भारतविरोधी कारवाया करणे, म्हणजे भारताशी चांगले संबंध ठेवणे’, असे बायडेन सरकारला वाटते का ? जर बायडेन सरकारला भारताशी खरेच चांगले संबंध ठेवायचे असते, तर सरकारने खलिस्तानी आतंकवादी पन्नू याला अटक करून भारताच्या स्वाधीन केले असते. बांगलादेशात हस्तक्षेप करून भारतविरोधी धर्मांधांना सत्तेवर बसवले नसते !