Canada Banned Australia Today YouTube : डॉ. एस्. जयशंकर यांची पत्रकार परिषद प्रसारित झाल्यानंतर कॅनडाने ऑस्ट्रेलियाच्या यू ट्यूब वाहिनीवर घातली बंदी !
कॅनडाचा भारतद्वेष चालूच !
ओटावा (कॅनडा) – ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या संकेतस्थळाने त्याच्या यू ट्यूब वाहिनीवर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथील संयुक्त पत्रकार परिषद प्रसारित केली होती. पत्रकार परिषदेचे प्रसारण झाल्यानंतर काही घंट्यांतच कॅनडाच्या सरकारने ‘ऑस्ट्रेलिया टुडे’च्या यू ट्यूब वाहिनीवर बंदी घातली. या प्रकरणी भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी भारत-कॅनडा राजनैतिक संबंधांवर भाष्य केले होते.
कॅनडाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ढोंगीपणाचे ! – भारताची टीका
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी देहली येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया टुडे’च्या यू ट्यूब वाहिनीवर बंदी घालण्यात आली असून आता कॅनडातील प्रेक्षकांसाठी ती उपलब्ध नाही. हा विचित्र प्रकार आहे. ही कृती कॅनडाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीच्या ढोंगीपणावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारी आहे. रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले की, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सिडनी येथे त्यांच्या प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ३ गोष्टींचा उल्लेख केला. प्रथम, कॅनडाने आरोप केले आणि कोणताही विशिष्ट पुरावा न देता एक नमुना विकसित केला. दुसरी गोष्ट त्यांनी अधोरेखित केली की, कॅनडातील भारतीय मुत्सद्यांवर ठेवण्यात येणारी पाळत, जी अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले. परराष्ट्रमंत्र्यांनी अधोरेखित केलेली तिसरी गोष्ट म्हणजे भारतविरोधी घटकांना कॅनडामध्ये राजकीय जागा देण्यात आली होती. त्यामुळे या सूत्रांवरून कॅनडाने ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ वाहिनीवर का बंदी घातली ?, हे लक्षात येते.
संपादकीय भूमिकाभारताने आता कॅनडाशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे, हाच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा एकमेव उपाय राहिला आहे. ज्या प्रकारे भारत पाकशी वागत आहे, तसेच आता कॅनडाशी वागणे आवश्यक आहे ! |