श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून संवाद साधणारी देवद (पनवेल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दुर्वा नित्यानंद भिसे (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. दुर्वा नित्यानंद भिसे ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२३ मध्ये कु. दुर्वा नित्यानंद भिसे हिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती.’ – संकलक)
‘कार्तिक शुक्ल सप्तमी (८.११.२०२४) या दिवशी कु. दुर्वा नित्यानंद भिसे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. दुर्वा नित्यानंद भिसे हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. भक्ती नित्यानंद भिसे (कु. दुर्वाची आई), देवद, नवीन पनवेल, जिल्हा रायगड.
१ अ. शिकण्याची वृत्ती : ‘कु. दुर्वाला एखादी गोष्ट येईपर्यंत ती तळमळीने प्रयत्न करते.
१ आ. शाळेतील मैत्रिणींना नामजप करायला सांगणे : एकदा दुर्वा मला म्हणाली, ‘‘आई, सर्व माणसे साधना करत असती, तर किती छान वाटले असते ! सर्व जण साधना का करत नाहीत ?’’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘त्यांना ‘साधना म्हणजे काय ? आणि साधना का करायची ? साधना केल्याने काय लाभ होतो ?’, याविषयी ठाऊक नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला नामजप करायला सांगितला आहे. तू शाळेतील तुझ्या मैत्रिणींना नामजप करायला सांगू शकतेस.’’ त्यानंतर दुर्वाने तिच्या शाळेतील मैत्रिणींना नामजप करायला सांगण्याचा प्रयत्न केला.’
२. श्री. नित्यानंद वसंत भिसे (कु. दुर्वाचे वडील)
२ अ. आश्रमात जाण्याची ओढ असणे : ‘दुर्वा तिच्या आईच्या समवेत प्रतिदिन देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाते. एकदा मी तिला विचारले, ‘‘तुला आश्रमात जाण्याचा कधी कंटाळा येत नाही का ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘बाबा, ‘आश्रमात जाऊ नये’, असे मला कधीच वाटत नाही आणि वाटणारही नाही.’’
२ आ. दुर्वाला आश्रमातील बालसाधक आणि अन्य मुले यांच्या वागण्यात जाणवलेला भेद : एकदा दुर्वा मला म्हणाली, ‘‘आश्रमातील बालसाधक आणि आपण रहात असलेल्या परिसरातील मुले यांच्यात पुष्कळ भेद आहे. आश्रमातील बालसाधक भांडत नाहीत. आपण रहात असलेल्या परिसरातील मुले एकमेकांशी भांडतात.
२ इ. भावजागृतीचा प्रयोग करणे : एकदा दुर्वाला रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही. तेव्हा तिने रात्री २ घंटे ‘रामनाथी आश्रमात जाऊन तेथील चैतन्य ग्रहण करत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग केला.
२ ई. श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून बोलणे
२ ई १. प्रश्नपत्रिकेतील न येणार्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारणे आणि तिला आतून सुचलेले उत्तर अचूक असणे : दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.
२ ई २. शंखातून येणार्या आवाजाविषयी श्रीकृष्णाला विचारणे आणि श्रीकृष्णाने दुर्वाला सांगितल्याप्रमाणे त्यातून समुद्रातील लाटांचा आवाज ऐकू येणे : देवद आश्रमातील एका साधकाने दुर्वाला शंख असलेली ‘किचेन’ (किल्ली (चावी) अडकवण्यासाठी साखळी) भेट दिली होती. त्या शंखातून आवाज येत होता. ‘तो आवाज कसला आहे ?’, हे दुर्वाला समजत नव्हते. तिने याविषयी सूक्ष्मातून श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा तिला श्रीकृष्णाने सांगितले, ‘शंख समुद्रात असतो. तो आवाज समुद्रातील पाण्याचा आहे.’ दुर्वाने असे सांगितल्यावर आम्ही तो शंख कानाजवळ धरला. तेव्हा ‘त्यातून समुद्रातील लाटांचा आवाज येत आहे’, असे आमच्या लक्षात आले.
२ उ. चुकांविषयी संवेदनशील
२ उ १. दुर्वा प्रतिदिन वहीत चुका लिहिते, उदा. ‘देवद आश्रमात सेवेला गेल्यावर आईने ‘नामजप कर’, असे सांगूनही मी (दुर्वाने) नामजप केला नाही. एका प्रसंगात मला (दुर्वाला) राग आला.
२ उ २. चूक झाल्यावर क्षमा मागणे : एकदा मी दुर्वाला विचारले, ‘‘तुला तुझी चूक कधी लक्षात येते ?’’ तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘माझ्याकडून चूक होत असतांनाच माझ्या लक्षात येते; पण ती चूक मला थांबवता येत नाही.’’ तुम्ही मला चांगल्या गोष्टी समजावत असता ना, तेव्हा कधी कधी माझी चिडचिड होत असते. तुम्ही चांगले सांगत असूनही माझी चिडचिड होत असते. ‘हे अयोग्य आहे’, हे मला समजत असते; पण मला ते थांबवता येत नाही.
मला कधीतरी चूक झाल्यावरही लक्षात येते. त्या वेळी मी क्षमा मागते.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १३.६.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |