आध्यात्मिक उपाय करतांना आवरण काढणे आणि न्यास करणे, हे स्थुलातून शक्य नसल्यास सूक्ष्मातून करा !
‘आध्यात्मिक उपाय करतांना आधी स्वत:च्या देहावरील आवरण काढणे महत्त्वाचे असते; कारण ते काढल्याविना उपायांच्या वेळी ईश्वरी शक्ती प्रभावीपणे ग्रहण करता येत नाही. मुद्रा करतांना न्यास असल्यास तो करणेही आवश्यक असते; कारण न्यास केल्याने उपायांच्या वेळी ग्रहण होणारी ईश्वरी शक्ती देहात असलेल्या त्रासाच्या मूलस्थानी प्रभावीपणे प्रक्षेपित करता येते. त्यामुळे त्रास अल्प कालावधीत न्यून होण्यास साहाय्य होते.
काही वेळा मात्र व्यक्तीला अती थकव्यामुळे किंवा हात दुखत असल्यामुळे आवरण काढणे किंवा न्यास करणे शक्य होत नाही. प्रवास करतांना, एखाद्या कार्यालयात गेल्यावर तेथे नामजप करायला थोडा वेळ मिळाल्यास अशा ठिकाणीही आवरण काढणे आणि न्यास करणे बहुधा शक्य होत नाही. अशा वेळी सूक्ष्मातून आवरण काढावे आणि न्यास करावा. या दोन्ही क्रिया सूक्ष्मातून करणे, म्हणजे या क्रिया आपण स्थुलातून जशा करू तशाच पण मनाने करणे. ‘आपण या क्रिया स्थुलातून केल्यावर जेवढा लाभ होतो, जवळजवळ तेवढाच लाभ या क्रिया सूक्ष्मातून केल्यानेही होतो’, असे मी अनेकदा अनुभवले आहे.
‘गुरुदेवांनी आपल्याला सूक्ष्मातून उपाय करण्याचे महत्त्व सांगून आणि शिकवून आपल्यावर केवढी कृपा केली आहे’, असा कृतज्ञताभाव मनात ठेवून उपाय करावेत.’
– (पू.) संदीप आळशी (२.११.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |