India-Afghanistan Relations : परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍याने काबुलमध्ये घेतली तालिबानच्या कार्यवाहक संरक्षणमंत्र्याची भेट

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी जे.पी. सिंह व तालिबानचा कार्यवाहक संरक्षणमंत्री महंमद युसूफ मुजाहिद

काबुल (अफगाणिस्तान) – भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण यांचा कार्यभार असणारे संयुक्त सचिव जे.पी. सिंह यांनी तालिबानचा कार्यवाहक संरक्षणमंत्री महंमद युसूफ मुजाहिद याची काबुलमध्ये भेट घेतली. जे.पी. सिंह यांनी तालिबानचा कार्यवाहक परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी याची, तसेच माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचीही भेट घेतली. युसूफ तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला उमर याचा मुलगा आहे. मुल्ला उमरच्या नेतृत्वाखाली तालिबानने वर्ष १९९६-२००१ पर्यंत अफगाणिस्तानवर राज्य केले. त्यानंतर अमेरिकेने त्याची सत्ता उलथून टाकली. मुल्ला उमरचा वर्ष २०१२ मध्ये मृत्यू झाला होता.

१. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दोन्ही देशांनी विशेषतः मानवतावादी आधारावर सहकार्यासह इतर सूत्रांवर लक्ष देण्यावर भर दिला.

२. दुसरीकडे भारतातील अफगाण दूतावासात तालिबानी मुत्सद्दी नियुक्त करण्याची अनुमती देण्यासाठी अफगाणिस्तान भारताला सातत्याने विनंती करत आहे.

३. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध होऊ नये, अशी भारताची इच्छा आहे. भारत मानवतावादी आधारावर साहाय्य आणि सहकार्य करण्यास, तसेच पुनर्निर्माण कार्यात सहकार्य करण्यास इच्छुक आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला भारताने अधिकृत मान्यता दिलेली नसली, तरी तसे न करताही अफगाणिस्तानशी संबंध पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे भारताचे मत आहे.