‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यंती’ आणि ‘परा’ या चार वाणींमधील गायनाचा साधिकेला जाणवलेला परिणाम
१. ‘मोठ्या आवाजात गाणे किंवा द्रुत (जलद) लयीत ताना घेत गाणे’, हे ‘वैखरी’ वाणीशी निगडित आहे’, असे वाटणे
‘सध्याचे गायक द्रुत लयीत ताना घेत गातात. काही गायक मोठ्या आवाजात गातात. तेव्हा त्यांचे गाणे मनाला अधिक भावत नाही. ‘अशा प्रकारचे गाणे हे वैखरी वाणीशी निगडित आहे’, असे मला वाटले. अशा प्रकारे गातांना ‘मन बहिर्मुख होऊन रजोगुण आणि मारकतत्त्व कार्यरत होते’, असे जाणवते. हे गायन केवळ स्थूलदेहाने होते.
(तान : रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’ असे म्हणतात.)
१ अ. द्रुत लयीत गाणे : गायनाचा सराव करतांना मी द्रुत लयीतील तानांचा अभ्यास करत होते. तेव्हा द्रुत लयीत तान घेतांना ‘शक्तीची वलये कार्यरत होऊन देहाभोवतीचे आवरण भरभर नष्ट झाले’, असे जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ ढेकरा आल्या; परंतु अशा प्रकारचे गायन अधिक काळ करायला जमले नाही. ते गायन वृत्ती बहिर्मुख करणारे वाटले. अशा प्रकारचे गायन करतांना स्वरांतील गोडवा जाणवत नव्हता, तसेच आनंदाची अनुभूतीही आली नाही.
१ आ. विलंबित (संथ) लयीत गाणे : द्रुत लयीतील गाणे गातांना जसे स्थूल देहावरील आवरण गेल्याचे जाणवले, त्याप्रकारे ‘विलंबित (संथ) लयीत गातांना सूक्ष्म देहांवरील रज-तम नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला पुष्कळ त्रास झाला. विलंबित लयीत गातांना एक एक स्वरातील आनंदाची अनुभूती घेता आली.
वरील प्रक्रियेत गायक वैखरी वाणीतील गायन अनुभवतो. ‘ही स्थिती जागृत अवस्थेशी निगडित आहे’, असे वाटले.
१ इ. ‘गाणे गुणगुणणे किंवा हळू आवाजात गाणे’, हे वैखरी वाणीशी निगडित असून यामुळे मन अंतर्मुख होणे : ‘आवाजाची पट्टी न्यून केली असता आवाजात अधिक सूक्ष्मता येते’, असे मला जाणवले. ‘गाणे गुणगुणणे किंवा हळू आवाजात गाणे’, हे वैखरी वाणीशी निगडित असून ते अधिक सूक्ष्म होत जाते. अशा प्रकारे सराव करतांना ‘मन थोडे अंतर्मुख झाल्याचे जाणवून हे गायनही स्थूलदेहाने होते’, असे माझ्या लक्षात आले.
२. ‘मनात गाणे’ हे ‘वैखरी आणि मध्यमा’ या दोन्ही वाणींशी निगडित असून यामुळे आनंदाची अनुभूती येण्यास प्रारंभ होणे
‘मनात गाणे’ हे वैखरी आणि मध्यमा या दोन्ही वाणींशी निगडित आहे’, असे वाटले. त्यामुळे आनंदाची अनुभूती येण्यास प्रारंभ होतो. किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत पू. देवबाबांनीही याविषयी साधकांना अभ्यास करायला सांगितला होता. त्यात त्यांनी ‘वैखरीतून गाणे आणि मनातून गाणे’, अशी तुलना करायला सांगितली होती. त्याप्रमाणे सराव करतांना मी मनातून खर्ज स्वर म्हटले. तेव्हा मला पुष्कळ थंडावा जाणवून शांतीची अनुभूती आली. जवळजवळ २ घंटे माझी ही स्थिती टिकून होती. ही स्थिती ‘जागृत अवस्थेशी निगडित आहे’, असे मला वाटले.
(मंद्र (खालचे सप्तक) आणि अती मंद्र सप्तकातील स्वरांना ‘खर्ज स्वर’ म्हणतात.)
२ अ. ‘एकदा गायलेला किंवा ऐकलेला राग मनात दिवसभर चालू रहाणे’, हे गाणे मध्यमा वाणीतून चालू असल्याचे लक्षण ! : गायनाचा सराव केल्यानंतर अनेकदा अशी अनुभूती येते की, ‘तो राग दिवसभर मनात चालू आहे.’ त्या रागाचे स्वर ऐकू येत रहातात. एखाद्या रागाचे ध्वनीमुद्रण ऐकल्यावर ‘तो राग मनात दिवसभर चालू राहिला आहे किंवा त्याचे स्वर ऐकू येत आहेत’, असा अनुभव बरेच जण घेतात. तेव्हा ‘हे गाणे मध्यमा वाणीने चालू आहे’, असे लक्षात आले.
पं. भीमसेन जोशी आणि पं. कुमार गंधर्व यांचे गायन ऐकल्यावर आनंदाची अनुभूती येते. ‘त्यांचे स्वर अनेक घंटे मनात ऐकू येत रहातात’, असा अनुभव अनेकांना आला आहे. ज्याप्रकारे झोपेतही चालू असणारा नामजप, तसेच आतून आपोआप होणारा नामजप हा मध्यमा वाणीने होतो, त्याप्रमाणे ‘दिवसभर आतून स्वर चालू रहाणे’, हे मध्यमा वाणीशी निगडित आहे’, असे वाटले. कुठल्याही आघाताविना हे स्वर ऐकू येत असल्याने ‘अनाहत नाद ऐकू येण्याचा हा पहिला टप्पा आहे’, असे वाटले. वैखरीतून सराव करतांना आनंदाची अधिक अनुभूती येत नाही; परंतु ‘मध्यमा वाणीत स्वर चालू असतांना कधीकधी अनपेक्षितपणे पुष्कळ आनंद, तसेच शांती यांची अनुभूती येते’, असेही जाणवते.
३. नाभीतून उत्पन्न होणारा आणि आघाताविना ऐकू येणारा अनाहत नाद म्हणजे ‘पश्यंती’ वाणी !
या अवस्थेत ‘गायकाला अनाहत नाद (आघाताविना ऐकू येणारा नाद) त्याच्या नाभीतून उत्पन्न होतो’, असे जाणवते. अनाहत नाद हा नाद स्थुलातून, म्हणजे कानांनी ऐकू येत नाही. योगसाधनेद्वारे समाधी अवस्थेत त्याचा अनुभव घेता येतो. ‘सतारवादन, घंटानाद, शंखनाद, ॐकार, ब्रह्मनाद, तसेच निसर्गातील विविध दैवी नाद’, अशा प्रकारचे अनाहत नाद ऐकू येतात. अनेक संतांच्या ओव्यांमध्ये अनाहत नादाच्या अनुभूतींचे उल्लेख आहेत, उदा. संत कबीर, संत जनाबाई !
वर उल्लेखलेल्या मध्यमा वाणीत अनेक स्वरांचे प्राबल्य असते, तर अनाहत नादात एकच स्वर सतत ऐकू येतो. ‘ही स्थिती सुषुप्ती अवस्थेशी निगडित आहे’, असे मला वाटले.
३ अ. संत जनाबाईंच्या ओव्या
शून्यावरी शून्य आहे। तयावरी शून्य पाहे।। १।।
प्रथम शून्य रक्तवर्ण। त्याचें नांव अधःशून्य।। २।।
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण। मध्य शून्य श्यामवर्ण।। ३।।
महा शून्य वर्ण नीळ। त्यांत स्वरूप केवळ।। ४।।
अनुहात घंटा श्रवणीं। ऐकुनी विस्मय जाहाली जनी।। ५।।
अर्थ : संत जनाबाई म्हणतात, ‘मनुष्याच्या बिजाकडे जाणारा मार्ग बघा. शून्यावर शून्य असून त्यावरही एक भलेमोठे शून्य आहे. अशा रितीने तेथे ७ शून्ये आहेत. त्यांतील सर्वांत पहिल्या शून्याचे नाव ‘अधःशून्य’ (शरिरात सर्वांत खालचे) असून ते रक्त, म्हणजेच लाल रंगाचे आहे. हे शून्य म्हणजे मूलाधारचक्र असून ते खाली जननेंद्रियाच्या जवळ स्थित असते.
सर्वांत वरच्या शून्याचे नाव ‘ऊर्ध्वशून्य’ असून ते श्वेतवर्णाचे आहे. हे शून्य म्हणजे टाळूवर उमलणारे पांढरे कमळ होय, जे टाळूवर असलेल्या दहाव्या द्वारातून, म्हणजेच ब्रह्मरंध्रातून कुंडलिनी बाहेर पडते, त्याच क्षणी उमलते.
मधले शून्य श्यामवर्णाचे असून ते नाभीजवळ, म्हणजेच शरिराच्या मध्यभागी स्थित आहे. त्याला ‘अग्निचक्र’ असे म्हणतात. सर्वांत मुख्य शून्य हे निळ्या रंगाचे असून त्यालाच ‘महाशून्य’ असे म्हणतात, जे टाळूवरील ब्रह्मरंध्रद्वाराच्या बाहेर आहे आणि याला ‘मनुष्याचे खरे स्वरूप’, असे म्हणतात. यामुळेच या शून्यात मनुष्याचा प्राण एकदा मिसळला की, तो स्वतःच्या स्वरूपाला जाऊन मिळतो. म्हणूनच जनाबाई म्हणतात, ‘या शून्यात आपले खरे स्वरूप असते.’
जनाबाई म्हणतात की, जेव्हा त्या योगमार्गाने गेल्या, तेव्हा एकेक करत त्यांची षट्चक्रे उघडत गेली. त्याचा परिणाम म्हणून हृदयामध्ये जेव्हा अनुहात (अनाहत) ध्वनी निनादू लागला, म्हणजेच ॐ कार घंटा वाजू लागली आणि तिचा नाद जेव्हा कानी आली, तेव्हा त्यांना अतिशय विस्मय झाला, म्हणजेच ‘आपण आता परब्रह्मामध्ये विलीन होणार’, या कल्पनेने आणि त्याच्या जाणिवेने त्या सुखावून गेल्या.
३ आ. संत कबिरांचा दोहा आणि त्याचा अर्थ
बाजत अनहद बांसुरी, तिरबेनी के तीर।
राग छतीसो होइ रहे, गरजत गगन गंभीर।।
अर्थ : ‘इडा’, ‘पिंगळा’ आणि ‘सुषुम्ना’ या नाड्यांच्या त्रिवेणी संगमावर अनाहत नादरूपी बासरी वाजत आहे. तेथून (भारतीय शास्त्रीय संगीताच्या मूळ) ३६ रागांचे धीरगंभीर स्वर गगनात ऐकू येत आहेत.
४. ‘परा’ वाणीमध्ये गायकाचा ‘मी गात आहे’, हा विचार नष्ट होऊन त्याला अद्वैताची अनुभूती येणे
या अवस्थेत गायक नादातीत होतो. या उच्च अवस्थेत ‘मी गात आहे’, हा गायकाचा विचारही नष्ट होतो. ‘गाणाराही तोच आहे, तसेच जे गात आहोत (ते स्वरही) तोच आहे’, अशी अनुभूती येते, म्हणजेच ‘गायक’ आणि ‘स्वर’ पूर्णपणे एकरूप होऊन जातात किंवा तादात्म्य पावतात. ‘कर्ता’ आणि ‘कर्म’ एकच होऊन जाते. असा साधक-कलाकार नादाच्या पुढच्या, म्हणजेच नादातीत अवस्थेत स्थिर होतो. गायक ब्रह्मस्वरूप होऊन जातो. ‘ही स्थिती तुर्यावस्थेशी निगडित आहे’, असे वाटले.
‘हे ब्रह्मस्वरूप गुरुदेव, साधक-कलाकारांकडून अपेक्षित अशी साधना तुम्हीच करवून घ्या. आमच्याकडून साधनेचे कठोर परिश्रम केले जाऊन आम्हालाही तुमच्या स्वरूपाची अनुभूती घेता येऊ दे’, ही प्रार्थना !’
– एक साधिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
|