शेतकरी आणि हिंदू यांच्या भूमी हडपण्याच्या निषेधार्थ निपाणीत भाजपचे मानवी साखळी आंदोलन !
निपाणी (कर्नाटक) – ‘वक्फ’च्या नावे शेतकर्यांच्या शेतभूमी, तसेच मंदिरांच्या भूमी हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. उतार्यावर थेट नावे चढवली गेली आहेत. ही अन्याय्य कारवाई कर्नाटक सरकारने दूर न केल्यास येणार्या दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी भाजपच्या आंदोलनप्रसंगी देण्यात आली. ‘वक्फ’ने शेतकरी आणि हिंदूंच्या भूमी हडपण्याच्या निषेधार्थ निपाणीत भाजपच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. सोनल कोठडीया म्हणाल्या, ‘‘चालू असलेला हा प्रकार निंदनीय आहे. कर्नाटक सरकारचे चालू असलेले हे अवैध काम तातडीने थांबले गेले पाहिजे.’’ प्रणव मानवी म्हणाले, ‘‘हिंदूंची भूमी हडपण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. कर्नाटक सरकारने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी नोटीस मागे घेण्याचा आदेश दिला आहे; पण याची कार्यवाही तातडीने झाली पाहिजे. नोटिसा तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.’’
या प्रसंगी ‘हालशुगर’चे अध्यक्ष एम्.पी. पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, माजी अध्यक्ष पवन पाटील, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, भाजप शहराध्यक्ष सूरज खवरे, हालशुगर संचालक विश्वनाथ कमते, संजय मठपती, आकाश शेट्टी यांच्यासह विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.