पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जिथे अडथळा आहे, तिथे चैतन्य अल्प असल्याने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक !

प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘जिथे अडथळा आहे, तिथे चैतन्य अल्प असते; म्हणून तिथे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायचे. अडथळा दूर होण्यासाठी उपायांना प्राधान्य द्यायचे. उपाय करत गेल्यावर स्थान पालटते; म्हणून वेगवेगळ्या स्थानांसाठी वेगळे जप येतात.’’

– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून), पुणे. (१३.६.२०२४)

पू. निर्मला दातेआजी
सौ. ज्‍योती दाते

२. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणार्‍या साधकाची आध्यात्मिक पातळी उच्च असणे आवश्यक !

अ. ‘आपली साधना अल्प असेल, तर अन्यांसाठी नामजपादी उपाय करतांना आपल्यावर आक्रमण होऊ शकते. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणार्‍या साधकाची आध्यात्मिक पातळी चांगली असेल, तर ज्याच्यासाठी नामजपादी उपाय केले जातात तो आणि उपाय करणारा अशा दोघांनाही त्रास होणार नाही अन् उपाय चांगले होतील. यासाठी साधना वाढवायला पाहिजे. उपाय करणार्‍या प्रत्येकाने ‘उपाय करण्याची पद्धत कशी आहे ? परिणाम काय होत आहेत ?’, यांची नोंद ठेवायची. तेव्हा काही चुकले किंवा उपाय परिणामकारक होत नसतील, तर एकमेकांना सांगायचे.

आ. उपाय करतांना ‘कोणता जप करायचा ?’ अंक कि बीजाक्षर हे आता आपण शोधतो. पूर्वी अंक नव्हते. आता पू. आजींसाठी १ ते १० यांमध्येच अंक शोधायचे. दहाच्यावर शोधायची आवश्यकता नाही; कारण पू. आजींची प्रगती होत आहे.

इ. उपाय करतांना हाताच्या तळव्याचा न्यास निर्गुण स्तरावर असतो आणि ५ बोटे एकत्र करून केलेला न्यास सगुण स्तरावर असतो.’

३. प्रश्नोत्तर

श्री. नरेंद्र दाते : पू. आजींची प्रगती कशी होत आहे ? त्या मृत्यूशी झुंज देत आहेत; म्हणून प्रगती, स्वतःचा देह संशोधनासाठी समर्पित केला आहे; म्हणून प्रगती कि मरणाकडे साक्षीभावाने पहात आहेत; म्हणून त्यांची प्रगती होत आहे ?

प.पू. डॉक्टर : पू. आजी बेशुद्धावस्थेकडून जागृतीकडे जात आहेत. पू. आजींची स्वतःची काहीच इच्छा नाही. त्यांचे सर्व ईश्वरेच्छेने चालू आहे. आपण सांगितलेले त्या ऐकत आहेत. त्या प्रतिसाद देत आहेत.’

– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), पुणे. (१९.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक