…अशा लोकांना मतदारांनी व्यवस्थेबाहेर काढायला हवे !
‘सर्वसामान्य जनतेला देशातील सर्व कायदे ठाऊक असले पाहिजेत’, अशी न्यायालयांची अपेक्षा आहे. ‘कायद्याचे अज्ञान हे बचावाचे कारण होऊ शकत नाही’, असे वेळोवेळी सांगितले गेले आहे. याला कारण सामान्य नागरिक हा कायद्याचा मान ठेवत असतो आणि कायद्यांचा सन्मान करत असतो. लोकप्रतिनिधी आणि त्यांचे राजकीय पक्ष यांना हा नियम आपल्या देशात बहुधा लागू नसावा. दिव्याखाली अंधार म्हणतात, ते हेच कि काय, असा विचार मनात आल्यावाचून रहात नाही; कारण कायदे करणे, हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. संसदेत वा विधीमंडळात बसून त्यांनी काम करावे, यासाठी त्यांची निवड केली जाते. तेथे बसून त्यांनी देशाच्या कारभाराचे कायदे करणे अपेक्षित आहे; पण केलेले कायदे त्यांनी पाळलेच पाहिजेत, असे बंधन त्यांच्यावर असल्याचे कुठे दिसून येत नाही. भले लोकप्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारत असतांना शपथ घेतलेली असली तरीही…
१. आज व्यंगचित्रकार आर्.के. लक्ष्मण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची आवश्यकता !
आज प्रकर्षाने ३ लोकांची आठवण येत आहे. त्यात एक आहेत व्यंगचित्रकार आर्.के. लक्ष्मण. दुसरे आहेत व्यंगचित्र कलेचा आधार घेत राजकीय क्षेत्रात थेट टीका करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तिसरे आहेत आपल्या वाणीने आणि लेखणीने सर्वसामान्य जनतेला खडबडून जागे करणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ! आर्.के. लक्ष्मण यांनी सामान्य जनतेची मने वाचलेली आहेत. त्या वाचनातून जे त्यांना दिसले, ते त्यांनी व्यंगचित्रासह त्यांच्या नेमक्या शब्दात मांडलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चित्रकलेचा, म्हणजेच कुंचल्याचा आधार घेत समाजप्रबोधनाचे फार मोठे काम केलेले आहे. मग त्यात सामाजिक, राजकीय वा राष्ट्र-धर्माचे कार्य असो. त्यांनी त्यांच्या प्रखर वाणीने आणि लेखणीने समाजातील व्यंगावरती नेमके भाष्य करत समाजाला जागृत करण्याचे काम केलेले आहे. स्वच्छ, स्पष्ट आणि नेमके भाष्य करत त्यांनी सर्वत्र जागृती केलेली आहे. आज आचार्य अत्रे यांच्यासारख्या परखडपणे भाष्य करणार्या पत्रकारांची फार मोठी आवश्यकता आहे.
आज राजकारणात जे काही चालू आहे, त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारी मंडळी समाजात दिसत नाहीत. त्याचे कारण कदाचित् अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असावेत अथवा आपणास कोणत्या भानगडीत गुंतवले जाईल, याची त्यांना भीती वाटत असणार आहे. यामुळे लोकशाही, राजकारण, राजकीय पक्ष, समाजकारण आणि देशहित यांच्यात ताळमेळ कसा बसवायचा, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे अन् तो सोडवायला हवा.
२. आचार्य प्र.के. अत्रे यांचे भाषण आणि सध्याची परिस्थिती
पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानात पुतळा उभा करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी भाषण केले होते. ते भाषण आणि त्या वेळेस त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आज प्रकर्षाने आठवते आहे. ते म्हणाले होते, ‘पूर्वीची मोठी मोठी माणसे फार अल्पायुषी असत. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर अवघ्या ३० व्या वर्षी गेले. आगरकर २९ व्या वर्षी गेले. नामदार गोखले वयाच्या ४९ व्या वर्षी गेले. बालकवी ठोंबरे २८ व्या वर्षी गेले. गडकरी ३४ व्या वर्षी गेले. माझ्या वयात लोकमान्य टिळक गेलेले होते. सध्या माणसे फार जगतात. पूर्वी माणसे आपापली कामे करायची आणि चालायला लागायची. मागे रेंगाळत नसत. सध्या मरेपर्यंत माणसे जगतात. आता सांगावे लागते. जरा मेहरबानी करा. आता पुष्कळ झाले. जसे परीक्षेमध्ये ३ तासांचा पेपर असतो आणि काही हुशार मुले पेपर अवघ्या दीड तासांत लिहून चालायला लागतात. काही काही मुले अशी मख्ख असतात की, घंटा जरी वाजली, तरी चालू असते. जरा एक पान तपासायचे आहे. शेवटी पर्यवेक्षक धक्के मारून त्याला बाहेर काढतात, तेव्हा ते जातात. काही काही माणसांना धक्के मारून बाहेर काढावे लागते. त्यांचे कार्य काही राहिलेले नसते; पण लोभ काही सुटलेला नसतो जीवनात.’
सध्याच्या लोकशाहीच्या राजकारणात कशाचाच कशाला ताळमेळ राहिलेला नाही; ना वयाला ना कार्याला, ना धोरणाला ना कृतीला. कोणता राजकीय पक्ष, कोणत्या धोरणात, केव्हा पालट करील, हे सांगता येत नाही. कोणता नेता, कोणत्या राजकीय पक्षात आणि किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. एका पक्षातून दुसर्या पक्षात कोण कशासाठी जाईल ? याला काही नीतीमत्ता राहिलेली नाही.
३. सध्याच्या मतदारांची स्थिती
सर्वसामान्य जनतेला राजकारणात जे काही चालू आहे, त्याची पूर्ण कल्पना आहे. सर्वसाधारणपणे कुणी राजकारण आणि राजकीय लोक यांविषयी बोलत नाही. मतदान करावयाचे म्हणून ते करतात. ते आपले कर्तव्य आहे, हे सांगण्यात येते. ठीक आहे; पण कर्तव्याला जर अधिकाराची जोड नसेल, तर ते कर्तव्य बिनकामाचे आहे. हे मतदाराच्या केव्हा लक्षात येईल ? हाच मोठा प्रश्न आहे. मतदाराला ‘राजा’ म्हणून मोठेपणा दिला जातो. हा मोठेपणा केवळ एक थोतांड आहे, हे आता हळूहळू लक्षात येऊ लागले आहे. मतदान न होणे, हे जेवढे वाईट आहे, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक झालेल्या मतदानाचा आदर न करणे, हे वाईट आहे. मतदारांना नादी लावत राजकीय पक्ष मतदारांना खेळवत बसतात. हे काही आता लपून राहिलेले नाही. मतदारांना आता सांगायची वेळ आलेली आहे. तुम्ही शिकलेले आहात कि नाहीत ?, याचा अधिक विचार करू नका. खरेतर गावाकडचा अडाणी मतदार हा अधिक हुशार आणि अधिक समजदार असतो, हे विसरून चालणार नाही. ते खेडूत नाहीत. खरेतर ते संस्काराने शहरी मतदारापेक्षा अधिक सजग असतात.
४. मतदारांनी राजकीय पक्षांना जाब विचारायला हवा !
सर्व मतदारांनी आता एक स्वतःची स्वतंत्र संघटना सिद्ध करून राजकीय पक्षांना जाब विचारायची वेळ आलेली आहे. आजमितीस कुणी भरवशाचा राहिला आहे, असे वाटत नाही. सर्वपक्षियांचा जो रूबाब चालतो तो जनतेच्या पैशावर. यातील एकही जण खिशातून पैसा काढत नाही, ही वस्तूस्थिती आहे. याउलट सार्वजनिक पैशातून जेवढे म्हणून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबियांचे, आपल्या सगेसोयर्यांचे (नातेवाइकांचे), आपल्या पाठीराख्यांचे आणि आपल्या राजकीय पक्षांचे खिसे भरून घेता येतील, तेवढे ते भरून घेत असतात.
भारतातील समस्त मतदार बंधू-भगिनींना आवाहन करावेसे वाटते की, आता तुम्ही एक व्हा. विचार करायला लागा. तुम्ही मत कशासाठी दिलेले आहे ? कुणाला दिलेले आहे ? तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा होत्या आणि आहेत. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत कि नाहीत ? याची वेळोवेळी शहानिशा करून घ्या. यात काही गडबड दिसली, तर पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. जर तुम्हाला दाखवलेली स्वप्ने, दिलेली आश्वासने पाळली जात नसतील, तर अशांना धक्के मारून राजकीय व्यवस्थेबाहेर काढायची वेळ आलेली आहे. परिणामी असा कोणताही आगाऊपणा करण्याचे धाडस कुणी करणार नाही.
– श्री. श्रीनिवास माधवराव वैद्य, सनदी लेखापाल, सोलापूर.