कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सोलापूर – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यातून लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे येतात. कार्तिकी यात्रा (कार्तिक एकादशी – १२ नोव्हेंबर) कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देऊन तात्काळ आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. कार्तिकी यात्रा नियोजनाविषयी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, ‘‘नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, तसेच चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरिकेडींग करावे. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची, तसेच प्रसादालयाच्या दुकानांची पडताळणी करण्यासाठी अधिक पथकांची नेमणूक करावी.’’ या वेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत  प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या सोयी-सुविधांची माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद आणि सुखकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.