रक्ताचे नमुने पालटण्यास सांगणारा अरुणकुमार सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला !

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील वाहनचालक, गुन्हा नोंद होताच पसार झालेला अरुणकुमार देवनाथ सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपिठाने याविषयीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी शिवाजीनगर, तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिंह यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यामुळे सिंह याला पुणे पोलिसांसमोर शरण यावे लागेल.

येरवडा भागातील कल्याणीनगर येथे १९ मे या दिवशी भरधाव ‘पोर्शे’ कारच्या धडकीमध्ये संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, पत्नी शिवानी, वाहनचालक सिंह यांनी ‘ससून’चे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर यांच्याशी संगनमत करून रक्ताचे नमुने पालटल्याचे अन्वेषणामधून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.