सनातन धर्म, प्राचीन संस्कृती यांवरील आरोपांना कलाकारांनी कलेद्वारे उत्तर द्यावे ! – चित्रपट अभिनेते योगेश सोमण

पुणे येथे ‘संस्कार भारती’च्या वतीने  ‘दीपसंध्या २०२४’ कार्यक्रम

डावीकडून लीना आढाव, योगेश सोमण, डॉ. पंडित नंदकिशोर कपोते

चिंचवड (जिल्हा पुणे) – परकियांच्या आक्रमणानंतरसुद्धा आपली कला, संस्कृती टिकून राहिली. ती वृद्धींगत करण्याचे दायित्व आपले आहे. कलाकारांनी कलेद्वारे धर्म आणि संस्कृती अन् संस्कारांचे विचार, वेद पुराण, दैदीप्यमान इतिहास यांची ‘सुस्पष्ट मांडणी करावी. धर्म-संस्कृतीचा अभिमान असलाच पाहिजे’, हे सांगूनही सनातन धर्म, प्राचीन संस्कृती यांच्यावर आरोप, चिखलफेक होते. कलाकारांनी सुसंस्कृत, पारंपरिक, ऐतिहासिक कलेद्वारे याला उत्तर द्यायला पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांनी केले.

उपस्थित कलाकार

निवडणुकीत सद्सद्विवेकबुद्धीने १०० टक्के मतदान करून स्वकर्तव्य पार पाडण्याचेही आवाहन त्यांनी केले. दीपावलीनिमित्त ‘संस्कार भारती’, पिंपरी-चिंचवड समितीच्या वतीने शहरातील कलाकारांचे एकत्रीकरण आणि कला सादरीकरण कार्यक्रम ‘दीपसंध्या २०२४’ येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावर ‘संस्कार भारती’, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष डॉ. पंडित नंदकिशोर कपोते, सचिव लीना आढाव यांची उपस्थिती होती.