दादरच्या बाजारपेठेतील कचर्‍याच्या स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांना काही घंटे राबावे लागते !

मुंबईत स्वच्छतेची ऐशी कि तैशी !

दादर बाजारपेठेत दुकानांबाहेरील रस्त्यावर फेकण्यात आलेला कचरा

मुंबई, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दादर येथे दुकानदार आणि फेरीवाले कचरा मुख्य रस्त्यावर टाकतात. हा कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केल्यास स्वच्छता कर्मचार्‍यांना तो उचलता येऊ शकेल; मात्र दादर बाजारपेठेत दुकानदार आणि फेरीवाले रस्त्यावर कचरा फेकत असल्यामुळे तेथील स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक कर्मचार्‍यांना ३ घंट्यांहून अधिक वेळ राबावे लागत आहे.

दादर बाजारपेठेत दुकानांबाहेरील रस्त्यावर फेकण्यात आलेला कचरा

अनेक वर्षांपासून चालू असलेला हा प्रकार ‘संपूर्ण स्वच्छ मुंबई’ अभियानानंतरही असाच चालू आहे. २० ऑक्टोबर २०२४ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दादरच्या बाजारपेठेत दुकानदार कचरा टाकत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर मुंबई महानगरपालिकेने ‘एक्स’ खात्यावरून संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. काही नागरिकांनीही याविषयी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती; मात्र त्यानंतरही दादर बाजारपेठेतील अस्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे.

कचरा टाकण्याची स्वयंशिस्त लावणे आवश्यक !

रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी दुकानदार दुकानातील कागद, प्लास्टिक, ओला आदी कचरा रस्त्यावर फेकतात, तर फेरीवाले जेथे अवैधपणे गाड्या लावतात, तेथेच कचरा टाकून जातात. त्यामुळे रात्री दादर (पूर्व) येथील कैलास लस्सी येथून एम्.एम्.जी.एस्. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य मार्गाला मिळणारा संपूर्ण रस्ता कचर्‍याने भरलेला असतो. सकाळपर्यंत हा सर्व कचरा रस्ताभर पसरतो. दुकानदार आणि फेरीवाले यांना स्वत:चा कचरा टाकण्याची जागा दिल्यास किंवा प्रत्येक दुकानाच्या बाहेर कचर्‍याची पेटी ठेवल्यास सर्वांना योग्य ठिकाणी कचरा टाकण्याची शिस्त लागेल.

दादर बाजारपेठेत दुकानांबाहेरील रस्त्यावर फेकण्यात आलेला कचरा

अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आवश्यक !

दुकानदार, नागरिक यांनी स्वच्छता राखावी आणि ती न राखल्यास त्यांवर दंडात्मक कारवाई करण्याविषयी मुंबई महानगरपालिकेकडून कार्यवाही होतांना दिसत नाही. दादर बाजारपेठेची स्वच्छतेविषयी दुरवस्था पहाता स्वच्छता अभियान म्हणजे केवळ महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी कचरा उचलणे हेच आहे का ? असा प्रश्न पडतो.

दादर बाजारपेठेत दुकानांबाहेरील रस्त्यावर फेकण्यात आलेला कचरा

वाचक आणि नागरिक यांना आवाहन !

शासनकर्ते आणि प्रशासन इतक्या वर्षांत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी स्वयंशिस्त लावू शकलेले नाहीत. केंद्रशासनाने ‘स्वच्छ अभियान’ घोषित करून अनेक वर्षे झाली. प्रत्यक्षात मात्र स्थानिक यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे समाज आणि राष्ट्र यांप्रती योगदान म्हणून वाचक अन् नागरिक यांनी स्थानिक ठिकाणच्या अस्वच्छतेविषयी प्रशासनाकडे तक्रार करावी आणि त्याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’लाही कळवावे.

निवडणुकीत विकासाच्या गप्पा, स्वच्छतेविषयी मात्र असंवेदनशीलता !

सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विकासाची मोठी आश्वासने देत आहेत; मात्र महाराष्ट्रातील मुंबईसारख्या प्रगत शहरात आणि त्यातील दादरसारख्या मुख्य ठिकाणी असलेली अस्वच्छतेची किळसवाणी स्थिती महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. याला राजकीय नेते, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक हे सर्वच उत्तरदायी आहेत. दादर बाजारपेठेतील अस्वच्छतेची गंभीर स्थिती लक्षात यावी, यासाठी काही छायाचित्रे या वृत्तासमवेत प्रसिद्ध करत आहोत.