संपादकीय : अमेरिकेचे ‘गोल्डन एज’ ?

विजयी डोनाल्ड ट्रम्प

जागतिक महाशक्तीच्या राष्ट्राध्यक्षपदी आता डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार आहेत. अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस (४७.५ टक्के मतांनी) यांचा पराभव केला. नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, ॲरिझोना, नेवाडा, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या सर्व ‘बॅटलग्राऊंड’ (रणक्षेत्र) राज्यांमध्येही ट्रम्प यांनी बाजी मारली. ही अशी राज्ये (स्विंग स्टेट्स) आहेत, जिथे दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत चुरशीची लढत असते आणि विजय कुणाच्याही पारड्यात पडू शकतो. यंदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी या सातही राज्यांत विजय मिळवण्याला ऐतिहासिक म्हटले पाहिजे. याचे कारण देशाच्या इतिहासात १८० वर्षांनंतर असे प्रथमच होत आहे, जेव्हा एखादा माजी राष्ट्राध्यक्ष मधल्या ४ वर्षांचा कार्यकाळ सोडला, तर पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनला आहे. दुसरीकडे कमला हॅरिस यांचा विजय झाला असता, तर अमेरिकेच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला असता. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

विजयाचे अन्वयार्थ !

आजच्या परिस्थितीत ट्रम्प यांच्या विजयाचे अनेक अन्वयार्थ आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री विलंबाने त्यांनी त्यांच्या पक्षाला संबोधित केले. या संबोधनातून त्यांचा अनुमान लावणे शक्य आहे. ट्रम्प म्हणाले, ‘‘ही इतिहासातील सर्वांत मोठी राजकीय चळवळ होती. हा सर्वाधिक अविश्वसनीय विजय आहे. आता अमेरिकेच्या सुवर्णयुगाला आरंभ होत आहे. आपण पुन्हा एकदा मोठी स्वप्ने पाहूया. अमेरिकेला पुन्हा श्रेष्ठ बनवूया.’’

ट्रम्प यांच्या पराभवासाठी ‘डीप स्टेट’ची यंत्रणा कामाला लागली होती. यामुळेच ४ वर्षांपूर्वी त्यांचा पराभव झाला होता. ‘डीप स्टेट’ ही यंत्रणा उदारमतवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांचे कर्ते-धर्ते हाकतात. त्यामुळे यंदा हॅरिस यांचा पराभव, म्हणजेच ‘डीप स्टेट’चा सपशेल पराभव होय ! गेल्या ३-४ महिन्यांच्या कालावधीत ट्रम्प यांच्यावर दोनदा झालेल्या जीवघेण्या आक्रमणांमागे कोण होते ? हा संशोधनाचा विषय असू शकेल; परंतु याला झुगारून ट्रम्प यांनी मुसंडी मारणे, त्यामुळेही हा विजय अविश्वसनीय आहे.

राष्ट्रवाद्यांचा विजय !

पुराणमतवादी नि राष्ट्रवादी शक्तींचा हा विजय आहे. याचा बोलका प्रत्यय, म्हणजे ट्रम्प यांच्या ‘एक्स’ खात्यावरून बांधता येईल. ‘एक्स’ हे वैचारिक खाद्याचे जागतिक सामाजिक माध्यम कट्टर साम्यवादी असलेल्या जॅक डॉर्से यांच्याकडे असतांना त्यांनी ट्रम्प यांच्या खात्यावर प्रतिबंध घातला होता. अब्जाधीश आणि प्रखर राष्ट्रवादी इलॉन मस्क यांनी ‘एक्स’ला विकत घेतल्यानंतर गणित पालटले अन् ट्रम्प यांचे खाते चालू करण्यासमवेत राष्ट्रवादी शक्तींना एक जागतिक हक्काचे व्यासपीठ मिळाले. आजच्या ‘इन्फॉर्मेशन एज’मध्ये ‘ट्रम्प यांचा विजय त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साम्यवादी शक्तींना मारक ठरला आहेच, याखेरीज राष्ट्रनिष्ठ शक्तींना सुगीचे दिवस आले आहेत’, असे म्हणण्यास वाव आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला उघड समर्थन आणि आता त्यांचा विजय झाल्यानंतर मस्क यांनी ‘तुम्हीच (‘एक्स’चे वापरकर्ते) आता प्रसारमाध्यम आहात’, या ‘एक्स’ पोस्टचा अर्थ त्याच दिशेकडे निर्देश करत आहे.

आर्थिक गणित !

ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या रक्षणार्थ उद्योग-व्यवसाय वाढवण्यासह मेक्सिको, तसेच मुसलमान देश येथून येणार्‍या शरणार्थींवर अंकुश आणला होता. आताही ते त्यासाठी कटीबद्ध असणार आहेत. मंदीच्या छायेतून जाणार्‍या अमेरिकी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ते तत्पर असतील. या अंतर्गत अमेरिकेची आर्थिक आणि व्यावसायिक धोरणे अन्य देशांना मारक ठरू शकतात. भारतही त्यासाठी अपवाद नसेल. अमेरिकेच्या उत्पादनांवर भारताकडून लावण्यात येणारा अतिरिक्त आयात शुल्क न्यून करण्यासाठी निवडणूक प्रचाराच्या कालावधीत ट्रम्प यांनी भारतावर आसूड ओढले होते. त्यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ संबोधले होते. ‘हार्ली डेव्हिडसन’ या दुचाकी आस्थापनाला भारतीय बाजारपेठ हवी असल्याने ट्रम्प हे त्यासाठी आग्रही असतील. थोडक्यात अमेरिकेत सुबत्ता आणण्यासाठी ट्रम्प भारतासह जगभरात प्रयत्न करणार आहेत.

भूराजकारण !

ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक राजकारणावर विशेष छाप पडणार आहे. मध्य-पूर्वेत इस्रायलला समर्थन देण्यासाठी अमेरिका तत्पर राहिली आहे. बायडेन प्रशासनाच्या या धोरणाविषयी ट्रम्प यांचे वेगळे मत नसेल. थोडक्यात इस्रायलला समर्थन बिनदिक्कतपणे चालू राहील, किंबहुना इराणचे प्रखर विरोधी असलेले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याने युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. मुख्य प्रश्न हा रशिया-युक्रेन युद्धाचा आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ट्रम्प यांचे प्रथम प्राधान्य मंदीतून सावरण्याचे असल्याने ते युक्रेनमधून काढता पाय घेऊ शकतात. यामुळे युक्रेन तोंडावर आपटेल कि काय, या विचाराने युक्रेनची जनता धास्तावली आहे. ‘नाटो’चे या युद्धावर पुढील धोरण तसे काळाच्या गर्भात दडलेले आहे. ट्रम्प यांनी सूतोवाच केले आहे की, ते युद्ध चालू करतील आणि युद्ध थांबवतील. त्यांच्या या वक्तव्यातून अडीच वर्षांपासून चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर परिणाम होणार, हे निश्चितपणे सांगायला वाव आहे. तिथे अमेरिकेचा प्रतिद्वंद्वी असलेल्या चीनला शह देण्यासाठी ट्रम्प हे प्रयत्नशील रहातील. ‘क्वाड’ला (‘क्वाड’ म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांचा गट) सक्षम करण्यासह तैवानला समर्थन देणे आणि भारताची घनिष्टता वाढवणे, हे ट्रम्प यांच्या प्राधान्यात वरच्या क्रमांकावर असेल. तसेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील जवळीक जगजाहीर आहे. त्याचा लाभ भारताला खलिस्तानवादाशी दोन हात करण्यासाठीही होऊ शकतो. या दृष्टीने मोदी यांनी ट्रम्प यांच्यावर दबाव आणला, तर त्यातून भारताचे हित साधले जाईल, अशी आशा करूया.

व्यापाराच्या दृष्टीकोनातून ट्रम्प यांचा विजय भारताला संमिश्र असला, तरी भारतातील देशविरोधी शक्तींना मोदी यांचे मित्र असणारे ट्रम्प यांचा विजय मारक ठरणार आहे. राहुल गांधी ज्या प्रकारे अमेरिकेत सहजपणे भारताची मानहानी करत असत, ते आता तितकेसे सोपे असणार नाही. शेवटी स्वत:च्या देशाचे हित पहाण्यासाठी ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्या तुलनेत अधिक उजवे आहेत आणि अमेरिकेला सुवर्णयुगाकडे घेऊन जाण्यासाठी तत्पर झाले आहेत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीतून खलिस्तानवादाला आळा बसेल, अशी आशा करूया !