Pune, Bengaluru Most Trafficked Cities : पुणे आणि बेंगळुरू ही आशिया खंडातील सर्वाधिक रहदारी असलेली शहरे !

जागतिक सूचीत लंडन अग्रक्रमावर !

न्यूयॉर्क (अमेरिका) – आशियाई शहरांमध्ये पुणे आणि बेंगळुरू ही शहरे सर्वाधिक रहदारी असल्याची शहरे असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’ या संस्थेने प्रसारित केलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. यांतर्गत जागतिक स्तरावर लंडनमध्ये सर्वाधिक रहदारी असते. जागतिक आकडेवारीत बेंगळुरू आणि पुणे ही अनुक्रमे ६ व्या आणि ७ व्या क्रमांकांवर आहेत. ही आकडेवारी वर्ष २०२३ च्या नोंदींचा अभ्यास करून देण्यात आली आहे. यात एखाद्या चारचाकीतून शहरातील १० कि.मी. अंतर कापायला किती वेळ लागतो, या आधारे क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी वाहनांची संख्या प्रत्येक ६ वर्षांनी दुप्पट होते

जागतिक आकडेवारीत नवी देहली ४४ व्या, तर मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे. काही शहरांची आकडेवारी पुढील सारणीत देण्यात आली आहे :

‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या संकेतस्थळानुसार हा अहवाल ६ खंडांतील ५५ देशांतील ३८७ शहरांच्या रहदारीचा अभ्यास करण्यात आला. या आकडेवारीत वरील ४ शहरे सोडली, तर अन्य कोणत्याच भारतीय शहराचा समावेश नाही. याचा अर्थ भारतातील केवळ या ४ प्रमुख शहरांचाच अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता. नोएडा, जयपूर, कर्णावती, कोलकाता, भाग्यनगर, चेन्नई आदी भारतीय शहरांचा अभ्यास केला असता, तर त्यांचे नावही आकडेवारीत वरच्या रांगेत असले असते, हे निश्‍चित !

आशियाई विकास बँकेच्या मते, शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी वाहनांची संख्या प्रत्येक ६ वर्षांनी दुप्पट होत आहे. तसेच शहरी विकास कायम ठेवण्यासाठी आशियाला वर्ष २०३० पर्यंत वार्षिक अनुमाने १४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आशियामध्ये प्रतिवर्षी ४ कोटी ४० लाख लोक शहरी लोकसंख्येमध्ये सामील होतात.