कॅनडामधील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.कडून निषेध !
कॅनडा शासन न्याय देणार असल्याचा विश्वास व्यक्त
मुंबई – हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.ने कॅनडाच्या ब्रॅम्टन येथील हिंदु सभा मंदिरावर झालेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. कॅनडातील हिंदु समुदायाच्या सुरक्षेविषयी आणि मानवी हक्कांसाठी, तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदु समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंताही संघाने व्यक्त केली आहे. ‘कॅनडातील कायदाव्यवस्था या घटनेच्या प्रकरणी योग्य न्याय देईल आणि या हिंसक कृत्यासाठी उत्तरदायी असलेल्यांवर निर्णायक कारवाई करेल’, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.
हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.ने म्हटले की,
१. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया येथे मंदिरांवर झालेली आक्रमणे पहाता ब्रॅम्प्टनमधील घटना वेगळी घटना नसून संपूर्ण उत्तर अमेरिकेतील हिंदूंना प्रभावित करणार्या चिंताजनक प्रवृत्तीचा भाग आहे. अशा प्रकारच्या आतंकवादाला आणि द्वेषाने प्रेरित हिंसाचाराला राजकीय अभिव्यक्ती म्हणून न्याय्य ठरवता येणार नाही. ते मानवी हक्कांचे, विशेषत: धार्मिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेल्या कायद्यांचे थेट उल्लंघन करतात आणि सामान्य लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात.
२. माध्यमे, शिक्षक, विचारवंत आणि ‘इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांद्वारे स्वतःचा प्रभाव निर्माण करणारे) यांना संघाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, हिंदु समुदायाला लक्ष्य करणार्या आतंकवाद्यांच्या वाढत्या लाटेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि अमेरिकी समाजाला असलेला धोका ओळखून सर्व प्रकारचे द्वेष अन् धर्मांधता यांचा निषेध करून शांततापूर्ण सहअस्तित्वावर आधारित संस्कृती वाढवण्याच्या दिशेने कार्य करण्याची आवश्यकता आहे.